Ajit Pawar on Congress: आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीचे पालकमंत्री पद मिळाले नाही. माणसात मिसळून काम केले तरच पक्ष वाढतो, बोर्ड लावून पक्ष वाढत नसतो. कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम केले पाहिजे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खूप काम करावे लागेल, अशा कानपिचक्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापुरातून पदाधिकाऱ्यांना दिल्या. अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. लोकशाही टिकवण्याचे आव्हान आज आपल्या सर्वांसमोर आहे, हे भ्रष्टाचारी सरकार आपल्याला उलथवून टाकायचे आहे. मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात कसे येतील हे पहा. आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात पूर्वी होत्या तेवढ्याच विधानसभेच्या जागा हव्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले. 


काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे भाऊ झालो आहोत


दरम्यान, अजित पवारांनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या वक्तव्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे भाऊ झालो आहोत, असे वक्तव्य अजित पवार यांनी मेळाव्यात केल्याने पुन्हा एकदा जागावाटपावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या सूचक विधानानंतर शरद पवार यांच्यासह अजित पवार तसेच नाना पटोले यांनी जागावाटपावरून कोणतीच चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. हा घटनाक्रम ताजा असताना अजित पवारांच्य वक्तव्याने काँग्रेस डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे या वक्तव्याचेही पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. 


कोल्हापूर जिल्हा नेहमीच शरद पवारांच्या जवळचा 


मी वस्ताद आहे, कार्यकर्त्यानो तुमची ताकद दाखवा. आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला जागा वाटपात स्थान देण्याचे बघतो. महापालिका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, नंतर लोकसभा लागतील. त्यामुळे राज्य ढवळून काढावे लागेल, असेही अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, महापुरुषांच्या विचाराने राष्ट्रवादी पक्ष चालवला जात आहे. कोल्हापूर जिल्हा नेहमीच शरद पवारांच्या जवळचा राहिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खूप काम करावं लागेल. 


भाकरी फिरवली जाणार 


अजित पवार यांनी मेळाव्यात बोलताना भाकरी फिरवावी लागणार आहे आणि भाकरी फिरवली जाणार असल्याचे सुतोवाच केले. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. नवीन नेतृत्व तयार करण्याचा आता आमचा प्रयत्न आहे. रोहित पवारला कर्जत जामखेडमध्ये काम करायला लावले. मी सांगितले तसे काम केले आणि काँग्रेसकडे असणार मतदारसंघ आपल्याकडे आला. कुठल्याही मतदारसंघात कुणाची मक्तेदारी नसते. 


शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय सर्वांच्या आग्रहाखातर घेतला. यामुळे मरगळ आलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आता कामाला लागला असल्याचे ते म्हणाले. मला मुख्यमंत्र्यांचा अपमान करायचा नाही, पण मुख्यमंत्री कधी कधी काय बोलतात हे कळत नाही, नुसते सर्वसामान्यांचे सरकार आहे म्हणायचे, पण सर्वसामान्यांसाठी काय केले हे सांगा? असा टोला त्यांनी लगावला. 


पण जनतेच्या डोक्यात पण पन्नास खोके बसलेत


आज मंदिरात गोमूत्र शिंपडले जात आहे, महापुरुषांबद्दल अपशब्द बोलतात, आमदार कसे बोलतात? सत्ताधारी आमदारांची वक्तव्ये वाईट आहेत, सत्तेची नशा त्यांच्या डोक्यात आहे, पण जनतेच्या डोक्यात पण पन्नास खोके बसलेत. पक्ष स्थापन कुणी केला, पक्ष कुणाचा कोर्टाने निकाल दिला असेल पण जनतेला हे पटले का? हे सरकार काही ना काही गोष्टी सांगून निवडणूका पुढे ढकलत आहे. कारण त्यांना कल्पना आलीय की या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये राग आहे, त्यामुळे निवडणूका पुढे ढकलल्या जात आहेत. पोपट मरू दे नाहीतर उडून जाऊ दे, आम्हाला काही अडचण नाही. महागाई, शेतकरी प्रश्नांवर बोला. नवाब मलिक समीर वानखेडेबद्दल जे बोलत होते ते त्यावेळी खोटे ठरवले गेले, पण आज समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्या संपतीची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.