Kolhapur : शिवसेना निष्ठावंत नेते आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत भगदाड पडते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपच्या किल्ल्यात गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला आहे. हाॅटेल मेरेडियनमध्ये तगड्या बंदोबस्तात त्यांची बडदास्त ठेवण्यात आली आहे. अर्थातच भाजपनेच हा डाव टाकला आहे का ? अशी चर्चा रंगली आहे. 


दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नाराज आमदारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचाही समावेश आहे. ते सकाळपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. दुसरी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि खासदार संजय मंडलिक एकाच गाडीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. 


आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क झाला तर ते नक्की परत येतील, असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. हे सगळं पेल्यातील वादळ ठरेल जास्त काही होणार नाही, असा विश्वासही खासदार मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माझ्याशी कोणी संपर्क केला नाही किंवा माझा कुणाशी संपर्क झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमकं काय झालं आहे हे कळल्याशिवाय बोलणं योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या