मुंबई : शिवसेनेचे निष्ठावंत नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे मागील काही महिन्यांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या संतापाचा स्फोट झाला. अखेर नाराज असलेल्या एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह मध्यरात्रीच सूरतमध्ये दाखल झाले. 


नेमकं घडलं काय?
विधानपरिषदेची धामधूम सुरु असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री कार्यालयापासून दूर ठेवण्यात आले होते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असूनही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रवेश दिला नाही. मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पाच-पाच आमदारांना दालनात बोलवून मतदानाची प्रक्रिया समजावत होते. हे सगळं चित्र पाहून शिंदेंनी मुख्यमंत्री कार्यालयातून काढता पाय घेतला आणि दुसऱ्या एका छोट्या केबिननमध्ये समर्थकांसोबत थांबले. या केबिनमध्येच शिंदे समर्थकांची कुरकुर सुरु झाली आणि सगळे एकमेकांमध्ये चर्चा करु लागले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये प्रवेश न देणं हा टर्निंग पॉईंट ठरला. दुपारच्या सुमाराला एकनाथ शिंदे विधानभवनाच्या बाहेर येऊन थेट गाडीत बसले, गाडीमधे कुणालाही न घेता बराच वेळ घालवला. त्यावेळी ते जरा भावनिक झाले होते.


त्यानंतर त्यांनी बराच विचार करुन आमदारांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर 'नंदनवन' येथे अनौपचारिक भेटीसाठी बोलवलं. सगळ्या आमदारांना घेऊन शिंदे ठाण्याला निघाले. त्यातील काही आमदार तिकडे गेले नाहीत. कट्टर शिंदेसमर्थक त्यांच्यासोबतच राहिले. त्यापैकी 10 ते 12 आमदार रात्री साडे अकराच्या सुमाराला सूरतला पोहोचले. तर एकनाथ शिंदे उरलेल्या आमदारांना घेऊन दीड वाजता सूरतमध्ये दाखल झाले. याची कुणकुण लागताच 'वर्षा'वर तातडीने आमदारांची बैठक बोलवली आणि त्यामध्ये मुंबईतील काही आमदार आणि महाष्ट्रातील ग्रामीण भागामधील काही आमदार होते. 


जयंत पाटील यांच्यासोबत बैठक
नॉट रिचेबल असलेल्या आमदारांना शोधण्यासाठी काही आमदारांना पाठवण्यात आलं. नॉट रिचेबल असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यावर फेऱ्या मारण्यात आल्या. त्याशिवाय मंत्री आणि आणि शोधाशोध सुरु झाली. मंत्री आणि आमदारांच्या पीएला फोन करुन तातडीने 'वर्षा'वर आणण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बैठक संपली.