Kolhapur Water News: कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा उपसाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसाबंदी करण्यात आली आहे. वळीव पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात सर्वदूर दमदार सरी अजूनही कोसळली नसल्याने पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पावसाचे आगमन लांबल्यास जिल्ह्यामध्ये पाणीबाणी होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. नद्यांच्या पात्रांनी सुद्धा तळ गाठला असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 15 ते 20 दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी आदेश काढला आहे. मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास पाणी समस्येला तोंड द्यायला लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उपसाबंदीच्या काळात अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा आदेशातून देण्यात आला आहे.
या ठिकाणी असेल उपसाबंदी
- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत भोगावती नदीच्या दोन्ही काठावर उपसाबंदी असेल
- तुळशी धरणापासून ते बीडपर्यंतचा भाग
- कुंभी धरणापासून ते भोगावतीच्या संगमापर्यंत
- कासारी धरणापासून ते प्रयाग चिखलीपर्यंतच्या संगमापर्यंतचा भाग
- पंचगंगा नदी शिंगणापूर ते इचलकरंजी कार्यवाहीचा भाग
जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती
दुसरीकडे, जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या राधानगरी धरणात 25 मे रोजीच्या आकडेवारीनुसार केवळ 1.89 टीएमसी पाणी आहे. गतवर्षी 2.38 टीएमसी पाणी होते. दुधगंगा धरणामध्ये 2.08 टीएमसी पाणी असून गतवर्षी 7.02 टीएमसी पाणी होते. तुळशी धरणामध्ये 1.09 टीएमसी पाणी असून गतवर्षी 1.64 टीएमसी पाणी होते. कासारी धरणामध्ये 0.61 टीएमसी पाणी असून गतवर्षी 0.71 टीएमसी पाणी होते. कुंभी धरणामध्ये 1.13 टीएमसी पाणीसाठा असून गेल्यावर्षी 1.27 टीएमसी पाणीसाठा होता. पाटगाव धरणात 0.92 टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी 1.34 टीएमसी होते. कडवी धरणात 0.90 पाणी असून गेल्यावर्षी 0.78 टीएमसी होते. वारणा धरणात 8.16 टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये 5.62 टीएमसी होते.
उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांनी तळ गाठणे नवीन नसले, तरी धरणामधील पाणी असल्याने चिंता करण्यासारखी परिस्थिती नव्हती. यंदा मात्र, या सर्वांना अपवाद झाला असून धरणांची स्थिती सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे मोसमी वेळेत आगमन न केल्यास परिस्थिती आव्हानात्मक होऊ शकते. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांसह जिल्ह्याचे पावसाकडे लक्ष आहे. वळीव पावसाने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी तापमानामुळे नद्यांच्या पाणी पातळीवर फारसा फरक पडलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या