Kolhapur Crime: कोल्हापूर शहरातील (Kolhapur News) शिवाजी पेठेतील दाम्पत्याचा वडणगेत (ता. करवीर) संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (ता. करवीर) मधुकर दिनकर कदम (वय 59) आणि जयश्री मधुकर कदम (49, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) यांचा बुधवारी संशयास्पद मृत्यू झाला. दोघांनी मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांच्या मुलींनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी दोघांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात गायत्री (वय 19) आणि विजया (17) दोन मुली आहेत.
एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले कदम यांना मधुमेहाचा त्रास सुरू होता. पत्नी जयश्री यांनाही काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू होता. मधुकर कदम मुळचे कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील आहेत. पत्नी आणि दोन मुलींसह एक वर्षभरापूर्वी ते वडणगेमधील त्यांच्या नवीन घरी वास्तव्यास गेले होते.
15 दिवसांपूर्वी आयुर्वेदिक औषध घेतले
कदम यांनी मधुमेहाचा त्रास असल्याने कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतमधील डॉक्टरकडून 15 दिवसांपूर्वी आयुर्वेदिक औषध घेतले होते. बुधवारी सकाळी पावडरचे औषध घेतल्यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले. पत्नी जयश्री घरी स्वयंपाक करत होत्या. औषध घेतल्यानंतर काही वेळातच जयश्री यांना श्वासोच्छवासास त्रास होऊ लागला आणि बेशुद्ध पडल्या. दूध आणण्यासाठी गेलेल मधुकर कदमही दूध डेअरीजवळच्या चौकात चक्कार येऊन पडले. ग्रामस्थानी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी परिस्थिती पाहून सीपीआरमध्ये पाठवले. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला होता.
कागल तालुक्यात तरुणाचा मृतदेह आढळला
दरम्यान, कागल निढोरी राज्य मार्गावर बामणी (ता. कागल) हद्दीतील शेतामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या खुना आहेत. दरम्यान मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव अमरसिंह दत्तात्रय थोरात (वय 30) असे आहे. तो वाळवा तालुक्यातील गोटखिंडे या गावचा असल्याचे समजते. कोल्हापुरातील लाॅ कॉलेजमध्ये द्वितीय वर्ष शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेली नाही. सदर घटनेची नोंद कागल पोलिसात झाली असून ते अधिक तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या