Kolhapur-Sangli Highway : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने हे मार्ग मृत्यूचे सापळे झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक भीषण अवस्था कोल्हापूर-सांगली रस्त्याची झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा सुखरुप घरी जाईल की नाही? याची कोणतीही श्वाश्वती नाही, इतकी भयावह अवस्था खड्ड्यांनी करून ठेवली आहे.


त्यामुळे संतप्त झालेल्या या मार्गावरील गावच्या ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. काल रुकडीजवळ रस्ता अडवत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या मार्गाची दुरावस्था झाली असून रोज नवीन नवीन अपघात घडत आहेत.  शिरोली फाटा ते सांगलीपर्यंत या रस्त्याची अवस्था सांगण्यापलीकडे गेली आहे. 


त्यामुळे या रस्त्याकडे लक्ष द्यावे म्हणून रूकडी गावचे माजी सरपंच अमित कुमार भोसले यांनी वारंवार निवेदन देऊनही रस्त्याचे काम झालेलं नाही. रस्त्याची पूर्ण चाळण झाली असून हा रस्त्याची डागडूजी करण्यासाठी काल आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी तब्बल दोन तास वाहने रोखून धरली होती. उपायोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 


आंदोलनाला वाहनधारकांकडूनही पाठिंबा 


पाठीचा आणि वाहनांचा दररोजच्या प्रवासाने खुळखुळा होत असल्याने ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला वाहनधारकांनी सुद्धा साथ दिली. त्यामुळे मार्गावर वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाची दखल घेत रुकडीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या संजय घोडावत विद्यापीठानेही पाठिंबा दिला. संजय घोडावत यांनी फोन करून आंदोलनाला पाठिंबा दिला. 



इतर महत्वाच्या बातम्या