Radhanagari Dam : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने काल रात्री साडे आठच्या सुमारास राधानगरी धरणाचा स्वयंचलित ६ व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला गेला. 


राधानगरी धरणातून एकूण 3 हजार 28 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी १८ फूट 11 इंचापर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील अजूनही 12 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या पावसाचे आगार असणाऱ्या तालुके सोडून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पुराचे संकट टळले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी होत आहे. तुरळक पावसाने उभ्या पिकांना लाभ होत आहे. त्यामुळे पीके वाढण्यास मदत होणार आहे.  


राधानगरी धरणातून 3 हजार 28 क्युसेक विसर्ग


काल दुपारपासून पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. यातून 1 हजार 428 व वीज निर्मितीसाठी 1 हजार 600 असा 3 हजार 28 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे. काळम्मावाडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने धरण 23 टीएमसी पर्यंत भरले आहे.


जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली



  • पंचगंगा नदी - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ

  • भोगावती नदी- हळदी कोगे, 

  • वारणा नदी- चिंचोली, तांदुळवाडी 

  • दूधगंगा नदी- दत्तवाड 


अलमट्टी धरणातूनही विसर्ग सुरुच


अलमट्टी धरणातूनही 77 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. हिप्परगी धरणातूनही 44 हजार हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. हिप्परगी आणि अलमट्टी धरण पूर्ण  क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे दोन्ही धरणातून जेवढी आवक होईल, त्याच प्रमाणात  विसर्ग केला जात आहे. 


दुसरीकडे कोयना धरणातून  2 हजार 100 ने विसर्ग सुरु आहे.


इतर महत्वाच्या बातम्या