Shri Binkhambi Ganesh Mandir : इच्छापूर्ती गणेश म्हणून प्रचलित असलेल्या बिनखांबी गणेश मंदिरातील मुर्तीवरील शेंदुराचा थर काढून पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे मुळ रुपात मुर्तीचे दर्शन भक्तांना होणार आहे. गेल्या महिनाभरापासून मुर्तीवरील शेंदूर काढण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे तब्बल 190 वर्षांनी मुळ रुपात मुर्ती दर्शनासाठी खुली झाली आहे. 


थर काढण्याचे काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सुरु होते. काल विधिवत पूजा करून मुर्तीची पुनर्प्रतिष्ठापना दर्शनासाठी खुली करण्यात आली. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आणि त्यांच्या पत्नी संयोगिता नाईकवाडे यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले.   


करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या पश्चिमेला कपिलतीर्थ मार्केटमध्ये कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्वर, उत्तरेला काशी विश्वेश्वर व जोतिबा, पूर्वेला जुन्या राजवाड्यातील भवानी मंदिर तर दक्षिणेला रंकभैरव, विठ्ठल आणि बिनखांबी गणेश मंदिर आहे. बिनखांबी मंदिरात एकही खांब नसल्याने या बिनखांबी मंदिर म्हणले जाते.


बिनखांबी मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुबक गणेश मूर्ती नजरेस पडते. मूर्तीचे दर्शन होताच भाविक नतमस्तक होतात. सध्या मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे असून गणेश जयंती व गणेश चतुर्थी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.


इतर महत्त्वाच्या बातम्या