Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कावणेमधील बलदंड पैलवानाचा गोट्यात कडबा कुट्टी मशिनचा शाॅक लागून दुर्दैवी अंत होण्याच्या घटनेला 24 तास होत नाही तोपर्यंत आणखी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. निगवे दुमाला (ता. करवीर) येथे सासरवाडीतील नातेवाईकाच्या लग्नाच्या हळद कार्यक्रमात पाण्याच्या शॉवरमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने निष्पाप तरुणाचा जीव गेला. तो नात्याने जावई होता. त्याचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. जोतिबा विठ्ठल कांबळे (वय 37, सध्या रा. कानाननगर, कोल्हापूर, मूळ रा. कोवाड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. जोतिबाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, चार महिन्यांचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. तो कोल्हापुरातील बी न्यूज कार्यालयात ऑफिस बाॅय होता. गेल्या 20 वर्षांपासून तो कार्यालयात काम करत होता. 


सासरवाडीत लग्नाला गेल्यानंतर काळाचा घाला 


जोतिबा सपत्नीक तीन मुलांसह लग्नासाठी निगवेमधील सासूरवाडीत नातेवाईकांच्या लग्नासाठी आला होता. बुधवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमासाठी दारात शॉवरची व्यवस्था करण्यात आली होती. शॉवरमध्ये लावलेल्या बल्बमध्ये करंट उतरल्याने शॉवरसाठी लावलेल्या लोखंडी पाईपला धरून थांबलेल्या जोतिबाला विजेचा धक्का बसला. त्यामुळे जोतिबा जागेवर गतप्राण झाला, तर  इतर दोघे किरकोळ जखमी झाले. नातेवाईकांनी तातडीने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 


गोठ्यातील कुट्टी मशीनचा शाॅक बसून पैलवानाचा करुण अंत


दरम्यान, करवीर तालुक्यातील कावणेत मंगळवारी एकशे सात किलो वजन, सहा फूट चार इंच उंच असलेल्या रांगड्या पैलवानाचा गोठ्यात कडबा कुट्टी मशीनचा शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पैलवान शिवदत्त उर्फ सोन्या मारुती पाटील (वय 28 रा. कावणे, ता. करवीर) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. भावाच्या अकाली मृत्यूमुळे बहिणींनी एकच आक्रोश केला. शेतात जनावरांच्या गोठ्यात कुट्टी मशीनने वैरण बारीक करत असताना शाॅक लागल्याने सोन्याचा मृत्यू झाला. निगवे खालसा गावातील तालमीमध्ये सराव करणाऱ्या शिवदत्तने कुस्तीमध्ये ओळख निर्माण केली होती.


शिवदत्त पैलवानकी करत असतानाच घरची जनावरे सांभाळून दुग्ध व्यवसाय करत होता. मंगळवारी शेतातील जनावरांच्या गोठ्याकडे गेला असता कडबा कुट्टी मशीनच्या सहाय्याने वैरणीची कुट्टी करत असताना विजेचा धक्का बसला आणि तो तिथेच कोसळला. बराच वेळ होऊनही शिवदत्त घरी न आल्याने आईने त्याच्या फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोन उचलत नसल्याने आई गोठ्याकडे गेली तेव्हा शिवदत्त कडबा कुट्टी मशीनच्या बाजूस पडलेला दिसला. यावेळी आईने केलेल्या आरडाओरडा ग्रामस्थही दाखल झाले. शिवदत्तला ग्रामस्थांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या :