Kolhapur Police: बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र पंडित 2013 मध्ये आयपीएस झाले आहेत. त्यानंतर भारतीय पोलिस सेवेत पोलीस अधीक्षकपदाचे प्रशिक्षण घेतले. नांदेडमध्ये त्यांनी दोन वर्षाच्या काळात पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने पोलीस दलाकडून त्यांची दखल घेण्यात आली आहे. त्यांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2018’ प्राप्त झाले आहे. मुंबईत येण्यापूर्वी ते नंदुरबारमध्ये कार्यरत होते. 


एसपी शैलेश बलकवडे गेल्या अडीच वर्षांपासून कोल्हापुरात कार्यरत होते. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून मोठी खांदेपालट केली आहे. 18 पोलिस निरीक्षकांच्या (पीआय) 4 जिल्ह्यांतर्गत आणि चार बदल्या केल्या आहेत. पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी बदल्या करण्यात आल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतही (Kolhapur LCB) मोठी खांदेपालट करताना 11 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. अनेक गुंडावर तडीपारीची कारवाई करत गुन्हेगारी मोडीत काढली आहे. चार दिवसांपूर्वीच आंतरराज्य टोळीचा पदार्फाश करण्यात यश आले होते. 


कोल्हापूरचे डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपुरात बदली


दुसरीकडे, राज्यातील 262 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्यांमध्ये 143 पोलिस निरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. डीवायएसपी रँकमधील 119 अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरचे डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची सांगलीमधील इस्लामपुरात बदली झाली आहे. सांगलीमधील अजित टिके यांची कोल्हापूर शहर पोलिस दलात डीवायएसपीपदी बदली झाली आहे. नाशिक ग्रामीणमधील मनमाड उपविभागाचे समीरसिंग साळवे यांची कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये झाली आहे. सायबर क्राईममधील पीआय संजय गोर्ले यांची पदोन्नती झाली आहे. त्यांची राज्य गुन्हे अन्वेषणच्या कोल्हापूर सीआयडीमध्ये अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


कोल्हापुरात 650 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार


दुसरीकडे, कोल्हापुरात नियुक्त पोलिस ठाण्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया होणार आहे. यामध्ये सुमारे 650 पोलिस कर्मचाऱ्यांचा बदल्या होणार आहेत. पोलिस ठाण्यात तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्याची अन्य पोलिस ठाण्यात बदली होते. कोरोना कालावधीमुळे या नियमित बदल्या थांबल्या गेल्या आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये गृह विभागाने बदलीचे आदेश काढले होते. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळा सुरु होत्या. शैक्षणिक वर्षांमध्ये त्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन या बदल्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या. बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विनंती बदल्यांचा विचार केला जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या