Rajaram Sakhar Karkhana : तर आमच्याकडूनही जशास तसे उत्तर दिलं जाईल; महाडिक गटाकडून सतेज पाटील गटाला इशारा
जर कोणी विनाकारण कारखाना कार्यस्थळावर गोंधळ घालणे किंवा प्रशासनास वेठीस धरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडूनही जशास तसेच उत्तर दिले जाईल, असा इशारा माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिला आहे.
Rajaram Sakhar Karkhana : दोन दिवसांपासून विरोधी गटाने जी काही स्टंटबाजी केली आणि खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये काही तथ्य नाही. निवडणुकीची सर्व प्रक्रिया कारखाना प्रशासन आणि शासकीय यंत्रणा अतिशय पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने पार पाडत आहेत. तरीही जर कोणी विनाकारण कारखाना कार्यस्थळावर गोंधळ घालणे किंवा प्रशासनास वेठीस धरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडूनही जशास तसेच उत्तर दिले जाईल, असा इशारा माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिला आहे. राजाराम कारखाना निवडणूक दोन्ही गटाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहेत.
विनाकारण या मुद्याला कवटाळून राजकारण
दिलीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सतेज पाटील गटाला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजाराम साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पार पडली. यावेळी पोटनियमांचे उल्लंघन केलेल्या सभासदांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. त्यामुळे सत्य परिस्थिती आणि नियमानुसार झालेली कारवाई पाहता त्यांनी या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित होते. असं न करता निवडणुकीसाठी आता काहीच मुद्दा शिल्लक नसल्याने काही लोक विनाकारण या मुद्याला कवटाळून राजकारण करत आहेत.
गोंधळ घालण्याचा मानस ठेऊन आले
त्यांनी म्हटले आहे की, आज पुन्हा त्याच पद्धतीने गोंधळ घालण्याचा मानस ठेऊन ते कारखान्यात आले होते, पण नेहमीप्रमाणे कारखाना प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली. उपस्थितांना अर्ज उपलब्ध करून दिले आणि रीतसर अर्ज भरून घेऊन स्वीकारले आहेत. कारखाना प्रशासनाने नेहमीच सभासदांना सहकार्याची भूमिका घेतली आहे. मागील आठवड्याभरात जवळपास 600 ते 700 अर्जानुसार कारखाना प्रशासनाने माहिती व दाखले तत्परतेने उपलब्ध करून दिलेले आहेत, हे मात्र विरोधक सोईस्करपणे विसरताना दिसतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, काल (30 मार्च) सकाळी विरोधकांकडून कारखाना प्रशासनाकडे रंजना अशोक पाटील व अशोक उमराव पाटील अशा 2 व्यक्तींचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांच्या अर्जानुसार त्यांना माहिती देण्यात आली. इतर कोणाचाही अर्ज काल आला नव्हता, पण विरोधकांनी मात्र अर्ज देऊनही माहिती दिली नाही, अशा प्रकारे धादांत खोटा आरोप केला. काल दुपारनंतर रामनवमीची सुट्टी असल्याने कारखाना कार्यस्थळावर अधिकारी उपस्थित नव्हते. नेमकी हीच संधी साधून संध्याकाळी विरोधकांनी जाणूनबुजून कारखाना कार्यस्थळावर गोंधळ घातला. अवैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांसाठी कागदपत्रे घ्यायला गेलो आणि तिथून सगळे पळून गेले असं खोटं चित्र उभं केलं गेलं.
इतर महत्वाच्या बातम्या