KDCC ED Raid : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अधिकाऱ्यांना (KDCC ED Raid) 30 तास कोंडून ठेवून अमानुष छळ करणाऱ्या 'ईडी'च्या (ED) अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी निवेदनातून कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनने शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जिल्हा बँकेच्या चौकशीचे कारण सांगून 30 तास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी झाली. शिवीगाळही करण्यात आली. अमानुषपणे डांबून ठेवले. ईडीने टाकलेला हा छापा राजकीय होता. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा या राजकारणात बळी दिला जात आहे. चौकशी झाल्यानंतर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन मुंबईला चौकशीसाठी नेले.
चौकशी करताना शिवीगाळ करण्यात आली
निवदेनात पुढे म्हटले आहे की, "30 तासांच्या चौकशीमुळे अधिकारी थकले होते. चौकशी करताना त्यांना शिवीगाळ करण्यात आली. मोबाईल काढून घेऊन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलू दिले नाही. अधिकाऱ्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या मुलांची अडवणूक केली. सक्तवसुली संचालनालयाच्या 22 अधिकाऱ्यांनी बँकेतील 30 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा अमानुष छळ केला. तीस तासांच्या चौकशीनंतर आरोग्य बिघडल्याने सुनील लाड या अधिकाऱ्याला हदयविकाराचा झटका आला. याला जबाबदार धरून ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे".
केडीसीसी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचे जंगी स्वागत; कर्मचाऱ्यांनी केली पुष्पवृष्टी
ईडीकडून तब्बल 70 तासांनी सुटका झाल्यानंतर कोल्हापुरात परतलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचे (KDCC ED Raid) मुख्यालयाच्या प्रांगणात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूर शहरातील शाखेतील कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, साखरे विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर, व निरीक्षक राजू खाडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
मुंबईत काय चौकशी झाली?
दरम्यान, ईडीने कोल्हापुरातील छापेमारीत जी चौकशी केली त्याच संदर्भाने चौकशी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारपर्यंत कार्यालयात बसवून ठेवले. त्यानंतर जबाब नोंदवले. कोणताही त्रास न देता जबाब नोंदवून घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी बँकेचा व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगत मार्चपर्यंत आणखी चांगली कामगिरी करून ईडीला दाखवू, असे आवाहन यावेळी केले.
इतर महत्वाच्या बातम्या