Kolhapur News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभासाठी (Convocation ceremony of Shivaji University) आमंत्रित करण्यात आलं आहे. विद्यापीठाचा (Shivaji University) दीक्षांत सोहळा 16 फेब्रुवारी रोजी होत आहे. या दौऱ्याला शिवसेनेकडून (ठाकरे गट) कडाडून विरोध करण्यात आला आहे. राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे. ज्या विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी अशा व्यक्तीला बोलावणं चुकीचं असल्याचेही म्हटले आहे. माफी मागावी अन्यथा शिवसेना राज्यपाल कोश्यारी चले जाव हाक देणार असल्याचेही म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) राज्यातील महापुरुषांविरोधात सातत्याने बेताल वक्तव्ये करून वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


शिवाजी विद्यापीठाचा 16 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ 


दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ (Convocation ceremony of Shivaji University) 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवारी (ता.04) झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यामध्ये व्यवस्थापन परिषदेवरील नूतन सदस्य उपस्थित होते. 


राज्यपालांनी कोल्हापुरात येण्यापूर्वी जाहीर माफी मागावी


या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी पत्रक प्रसिद्धीस देऊन राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, "राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. ज्या विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी अशा व्यक्तीला बोलवणे चुकीचं आहे. कुलगुरू व अन्य मान्यवरांना कदाचित याचा विसर पडलेला असेल. परंतु, शिवसेना, शिवभक्त, शिवप्रेमी तो अवमान कदापि विसरणार नाही. राज्यपालांनी कोल्हापुरात येण्यापूर्वी जाहीर माफी मागावी. तसे  न केल्यास शिवभक्त, शिवप्रेमी जनता व विषेशतः विद्यार्थ्यांनी दिक्षांत समारंभावर बहिष्कार टाकून निषेध नोंदवावा." 


शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा 6 फेब्रुवारीपासून 


दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या(Shivaji University) हिवाळी सत्रातील सर्व विषयांची परीक्षा उद्यापासून सोमवार (6 फेब्रुवारी) पासून नियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्याचा निर्णय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. दरम्यान, गुरुवार ते शनिवार या तीन दिवशी स्थगित केलेल्या (Kolhapur News) विषयांच्या परीक्षेची तारीख लवकरच कळवण्यात येईल, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या