Hasan Mushrif : कागल (Kagal) तालुक्यात विकासकामांची चोरी करणारी टोळीच कार्यरत झाली आहे, कार्यकर्त्यांनी यापासून सावध राहावे. नियोनबध्द आराखडा तयार करून कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदार संघातील विकासकामे मार्गी लावली असताना केवळ पक्षाची सत्ता आल्याने उद्घाटने करून श्रेय लाटण्याचे उद्योग बंद करा, अशा शब्दात आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर हल्लाबोल केला. म्हाकवे (ता. कागल) येथे जलजीवन पाणी पुरवठा योजनेतून चार कोटी, 84 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन खोदकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुश्रीफ यांनी चांगलीच तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, जे साधे ग्रामपंचायत सदस्य नाहीत त्यांना विकासकामांची उद्घाटने करून श्रेय घेण्याची घाई झाली आहे. गेल्या 30 वर्षात आपण केलेल्या कामामुळे जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले.

Continues below advertisement

"आता लढाई अपरिपक्व, अडाणी व्यक्तीशी"

ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन आपणच करणार, अशी वक्तव्य कागलमधील काही मंडळी करत आहेत. राजकारणात प्रोटोकॉल असतात. याची जाणीवच नसणाऱ्या अज्ञानी, अडाणी आणि अपरिपक्व व्यक्तींशी आता आपल्याला लढाई करावी लागणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे".

काळभैरी मंदिर तीर्थस्थळांच्या नकाशावर अग्रभागी आणू 

दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गडहिंग्लज शहरातील लाखेनगर वसाहतीच्या प्रवेशद्वारापासून श्री काळभैरव मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची खडीकरण रुंदीकरण डांबरीकरण संरक्षक भिंतीसह मोरी बांधकाम अशा सव्वा सहा कोटी निधीच्या कामाचा प्रारंभ माझ्या हस्ते झाला. यावेळी ते म्हणाले की, "काळभैरी देवस्थान हे महाराष्ट्र सीमा भागातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आणि गडहिंग्लज शहराचे जागृत देवस्थान आहे. या मंदिराला महाराष्ट्र राज्य सरकारच्या तीर्थस्थळांच्या नकाशावर अग्रभागी आणू".त्यांनी सांगितले की, "काळभैरी देवाची महती कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात व सीमा भागातही आहे. राज्यासह सीमा भागातून लाखो भाविक नेहमी दर्शनासाठी व यात्रेसाठी येत असतात. मंदिर व परिसराला आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहू."

Continues below advertisement

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर, गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष किरणआण्णा कदम, वसंतराव यमगेकर,उदयराव जोशी, अशोकराव मेंडुले, कृष्णराव वांगडे, सुरेशआण्णा कोळकी, अशोकराव खोत, शंकरराव डवरी, अशोक राक्षे, कलगोंडा कांबळे, दिलीप राक्षे, पांडू खोत, राहुल शिरकोळे, रश्मीराज देसाई, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले आदी प्रमुख उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या