Shahu Maharaj : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या दुरदृष्टीनेच कोल्हापूर जिल्हा सधन समजला जातो. आरक्षणाचे जनक म्हणून या लोकराजाकडे पाहिले. समतेची शिकवण देणारा राजा म्हणून ओळखला जातो. त्याच लोकराजाची ओळख करवीर संस्थानला आजच्याच दिवशी 17 मार्च 1884 रोजी झाली होती. याच दिवशी त्यांचा करवीर संस्थानातील दत्तकविधी पार पडला होता. 


ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांनी तो प्रसंग 'राजर्षी शाहू छत्रपती महाराज 'या पुस्तकातून मांडला आहे. चौथ्या शिवाजी महाराजांचा झालेला मृत्यू त्यानंतर एकट्या पडलेल्या त्यांच्या पत्नी आनंदीबाई आणि त्यानंतर झालेला दत्तकविधी यांचा उहापोह डाॅ. पवार यांनी 'करवीर संस्थान व दत्तक विधान' मधून मांडला आहे. महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलमध्ये झाला. शाहू महाराजांचे बालपणातील नाव यशवंतराव होते. आईचे नाव राधाबाई, तर वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे होते. आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी रक्ताच्या नात्याने संबंध होता. त्यावेली आबासाहेब करवीर संस्थानचे राजप्रतिनिधी (रिजंट) होते. 


करवीर संस्थान व दत्तक विधान काय आहे तो प्रसंग?


आबासाहेब करवीर संस्थानचे रिजंट म्हणून निवड झाली त्यावेळी करवीरचे छत्रपती म्हणून तेव्हा चौथे शिवाजी महाराज गादीवर होते. त्या काळात इंग्रजांचे राज्य होते आणि करवीर संस्थानावरही इंग्रजांचा कब्जा होता. चौथ्या शिवाजी महाराजांना इंग्रज स्वतंत्रपणे कारभार करू देत नव्हते. माधवराव बर्वे हा संस्थानचा त्या वेळी 'दिवाण' होता. मात्र, तो चौथ्या शिवाजी महाराजांना सतत त्रास देत होता. इंग्रज अधिकाऱ्यांकडे मुद्दामच महाराजांची बदनामीकारक तक्रारही करीत असे. दुसरीकडे, शिवरायांचा प्रचंड आदर असल्याने करवीरचे संस्थान अबाधित राहिले होते. शिवाजी महाराजांच्या गादीचे वारसदार म्हणून करवीर घराण्यातील छत्रपतींना सर्व महाराष्ट्रातील लोक आदर देत होते. अशा प्रकारच्या लोकनिष्ठेमुळेच इंग्रजांना करवीरचे संस्थान मनात असूनही बरखास्त करता आले नव्हते. या गोष्टीचा राग अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनाही होता. मात्र माधवराव बर्व्यासारखे काही मतलबी लोकही करवीरच्या गादीचा द्वेष करीत होते.


चौथे शिवाजी महाराज मनोरुग्ण असल्याचे सांगितले


दिवाण असलेल्या बर्वे या अधिकाऱ्याने उद्दामपणाचा कळस करताना चौथे शिवाजी महाराज मनोरुग्ण असल्याचे इंग्रजांना मुद्दामच सांगितले. मतलबी इंग्रजांनी त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि चौथ्या शिवाजी महाराजांना अटक करून त्यांना अहमदनगर येथील किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. अहमदनगर येथील किल्ल्यात इंग्रज अधिकाऱ्यांनी चौथ्या शिवाजी महाराजांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यातच एकदा एका मग्रुर इंग्रज अधिकाऱ्याबरोबर झालेल्या झटापटीत चौथ्या शिवाजी महाराजांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यावेळी महाराजांचे वय केवळ 21 होते. त्यांच्या पत्नी राणी आनंदीबाई या तर वयाने खूपच लहान होत्या. त्यांना मुलबाळ वगैरे काहीच नव्हते. 


करवीरची गादी पोरकी झाली


या दुर्दैवी घटनेनंतर करवीरचं राजसिंहासन पोरकं झालं. एकीकडे शोक आणि दुसरीकडे इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनांत प्रचंड असंतोष आणि राग उफाळून येऊ लागला. करवीर संस्थानही खालसा होणार? अशीही चर्चा रंगली होती. त्यामुळे लोकभावना  ध्यानात घेऊन आबासाहेबांनी इंग्रजांशी बोलणी केली. आनंदीबाईंचे आणि राजपरिवाराचे त्यांनी सांत्वन करत करवीर संस्थानसाठी दत्तक वारस मंजूर व्हावा म्हणून त्यांना इंग्रज सरकारकडे अर्ज करण्यास सुचविले.


आनंदीबाईंचा पुढाकार


त्या कठीण परिस्थितीतही आनंदीबाईंनी आपले आभाळाएवढे दुःख बाजूला ठेवले. शिवछत्रपतींच्या गादीचे महत्त्व आणि रयतेच्या श्रद्धेचा मान राखत आनंदीबाईनी दत्तक वारस मंजूर करावा. कोल्हापूर संस्थानचे रिजंट आबासाहेब घाटगे यांचे थोरले चिरंजीव यशवंतराव यांना दत्तक घेण्याची संमती द्यावी, म्हणून मुंबईच्या गव्हर्नराकडे अर्ज केला. आबासाहेब हे तर कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार होते. शिवाय ते शिवछत्रपतींच्या रक्ताच्या नातेसंबंधातीलही होते. 


...आणि यशवंतराव शाहू छत्रपती झाले


यशवंतराव त्या वेळी वयाने दहा वर्षांचे आणि थोरले होते. तब्येतीने जसे ते धट्टाकट्टे होते, तसेच बुद्धीनेही तल्लख होते.  साहजिकच करवीर संस्थानचा दत्तक वारस म्हणून आनंदीबाई आणि राजपरिवारातील इतर सदस्यांनी यशवंतरावांची एकमताने निवड केली. त्यांच्या या निवडीस सर्वांनी आनंदाने संमती दिली. आनंदीबाईंनी मग यशवंतरावांना विधिवत दत्तक घेतले. शास्त्रोक्त पद्धतीने केलेला तो दत्तक विधी समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. तो दिवस होता 17 मार्च 1884. या समारंभात यशवंतरावांची करवीर संस्थानचे राजे म्हणून घोषणा करण्यात आली आणि त्यांचे नाव ठेवण्यात आले 'शाहू छत्रपती'. आणि 'शाहू छत्रपतींचा विजय असो!, छत्रपती शिवाजी महाराज की जय...!' असा जयघोष झाला. 


(ज्येष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार यांच्या 'राजर्षी शाहू छत्रपती महाराज' यांच्या पुस्तकातून साभार)