कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे संजय मंडलिक यांचा एक लाख 54 हजार मतांनी पराभव केला. या पराभवामुळे महायुतीमध्ये आता वादाची धुमारे फुटले आहेत. याची पहिली ठिणगी कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये पडली आहे. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा पूर्णतः अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या खांद्यावर होती. कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांनी केलेला सावध प्रचार संजय मंडलिकांच्या पराभवास कारण ठरल्याची चर्चा आहे. असे असतानाच आता मुश्रीफ आणि घाटगे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.  


वाचा : कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसने 25 वर्षांनी झेंडा फडकवला, पण हक्काच्या दोन विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घटले!


मुश्रीफ-घाटगे यांचे कार्यकर्ते सोशल मीडियात एकमेकांवर तुटून पडले


हसन मुश्रीफ, संजय मंडलिक आणि भाजप नेते समरजितसिंह घाटगे हे तिन्ही नेते एकत्रित असल्याने कागलमधून सर्वाधिक लीड संजय मंडलिक यांना मिळेल, अशीच चर्चा लोकसभा निवडणुकीत राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र, कागलमधूनच महायुतीचा फुगा फुटला. यानंतर आता आपण एकमेकांवर खापर फोडण्याची स्पर्धा लागली आहे. संजय मंडलिकांचे पराभवाचे विश्लेषण करण्यात गुंतले असतानाच हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांचे कार्यकर्ते सोशल मीडियामध्ये मात्र एकमेकांवर तुटून पडले आहेत. दोन्ही गटांकडून पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. 


दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियामध्ये एकमेकांविरोधात पोस्ट करण्यात येत आहेत. इतकेच नव्हे, तर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप करतानाच प्रामाणिकपणे काम केलं नसल्याचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे या आरोपांमुळे कागल विधानसभेला आत्ताच ठिणगी पडली आहे का? अशी चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मुश्रीफ विरुद्ध घाटगे असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे या वादाला आतापासूनच सुरुवात झाली आहे.


दरम्यान, संजय मंडलिक न मिळालेलं मताधिक्य हा सुद्धा कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी शाहू महाराज यांना साथ दिली होती. मात्र, मुश्रीफ आणि घाटगे गट कागलमध्ये संजय मंडलिकांसोबत असूनही अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाही.


कोल्हापूर लोकसभा मतदार संघात कोणाला किती लीड?


1. चंदगड विधानसभा मतदार संघ


शाहू महाराज - 108594
संजय मंडलिक - 99656


2. राधानगरी विधानसभा मतदार संघ


शाहू महाराज- 146107
संजय मंडलिक- 80503


3. कागल विधानसभा मतदार संघ


शाहू महाराज- 114023
संजय मंडलिक- 127881 


4. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ


शाहू महाराज-  123873
संजय मंडलिक- 117171


5. करवीर विधानसभा मतदार संघ


शाहू महाराज- 156780
संजय मंडलिक- 85385


6. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ


शाहू महाराज - 100946
संजय मंडलिक- 86418


इतर महत्वाच्या बातम्या