Kolhapur Crime: संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; एपीआय राहुल राऊत निलंबित, वडिलांनी शिकवले, पण खाकी वर्दी अंगावर येताच उचापतीच सर्वाधिक!
गडहिंग्लजमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल करु नये, पोलिस तपासात दबाव आणू नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत निलंबन असेल.
Kolhapur Crime : उद्योजक संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय राहुल राऊतला निलंबित करण्यात आले आहे. त्याला निलंबित केल्याची माहिती अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे. माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊतने संतोष शिंदे यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. यांच्या त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह विष प्राशन केल्यानंतर गळा चिरून आत्महत्या केली होती. या प्रकरणात शुभदा पाटील आणि राहुल राऊतला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून ती आज (30 जून) संपत आहे.
राहुल राऊतला निलंबित केल्याचा आदेश पोलिसांना प्राप्त झाला आहे. अमरावती पोलिस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. गडहिंग्लजमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल करु नये, पोलिस तपासात दबाव आणू नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही निलंबनाची कारवाई असणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी घातपात की अपघात या अनुषंगानेही तपास सुरु केला आहे. आतापर्यंत ‘फॉरेन्सिक लॅब’च्या पथकाने दुसऱ्यांदा घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यामुळे या घटनेचा अजूनही उलघडा झालेला नाही. पोलिस निरीक्षक गजानन सरगर अधिकारी तपास करीत आहेत.
अंगावर वर्दी येताच उचापतीच सर्वाधिक!
राहुल हा मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील निलजीमधील आहे. वडिलांनी अधिकारी होण्यासाठी त्याला प्रोत्साहान दिले होते. मात्र, अंगावर वर्दी येताच उचापती आणि भानगडीच सर्वाधिक केल्या आहेत. त्याच्या वर्तनाने नातेवाईकांना सुद्धा धक्का बसला आहे. गडहिंग्लजमध्ये त्याला बेड्या पडल्या असल्या तरी यापूर्वी त्याच्याविरोधात यवतमाळ, मारेगाव, राजापेठ, कोतवाली, मुंबईत तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काम कमी आणि उचापतीच सर्वाधिक अशी स्थिती आहे. कोतवालीमध्ये त्याच्याविरोधात झालेल्या तक्रारीनंतर अमरावती कंट्रोल रुमला बदली करण्यात आली होती.
आत्महत्येस प्रवृत्त करूनही निर्विकार!
दरम्यान, पोलिसांकडून या दोघांची विविध पैलूच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. मात्र, ‘त्यांच्या आत्महत्येशी आमचा काही संबंध नाही, आम्ही काही केले नाही, असा सूर शुभदा पाटील आणि राहुलने लावला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. दुसरीकडे गडहिंग्लजमध्ये दोन्ही संशयित आरोपींविरोधात अजूनही संतप्त भावना कायम आहेत. शिवसेना ठाकरे गट, न्यायनिवाडा लोकनेता फौंडेशनसह महिला कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘सीबीआय’ चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या