Kolhapur Crime : रुईकर कॉलनीत बंगला फोडून 20 तोळे दागिने लंपास, चोरट्यांचा राहत्या घरात तीन तास मुक्तसंचार, जाताना शौचही करुन गेले
कोल्हापूर : सुतार कुटुंबीय मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असताना चोरट्यांचा बंगल्यात तीन तास धुमाकूळ सुरु होता. मात्र, कुटुंबाला याचा किंचिंतही अंदाज आला नाही. ही घटना 16 मे रोजी मध्यरात्री घडली.
Kolhapur Crime: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटना सुरुच आहेत. कोल्हापूर शहरातील रुईकर काॅलनीत राहत्या बंगल्यात चोरट्यांनी मध्यरात्री घरात घुसून तब्बल 20 तोळे सोने आणि दारातील मोपेडही लंपास केली. चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केल्यानंतर तब्बल तीन तास मुक्तसंचार सुरु होता. इतकंच नव्हे तर त्याच ठिकाणी शौच केला आहे. अशाचप्रकारे चोरी आणि शौच करुन जाण्याचा प्रकार राजारामपुरीमध्ये झाला होता. त्यामुळे चोरी करणारी टोळी बहुधा एकच असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रुईकर कॉलनीत निरंजन वायचळ यांच्या बंगल्यात सूरज हिराप्पा सुतार भाडेतत्त्वावर राहतात. सुतार मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असताना चोरट्यांचा बंगल्यात तीन तास धुमाकूळ सुरु होता. मात्र, कुटुंबाला याचा किंचितही अंदाज आला नाही. ही घटना 16 मे रोजी मध्यरात्री घडली. चोरी गेलेला मुद्देमाल तब्बल 12 लाखांच्या घरात आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करुन तपास सुरु केला आहे.
खिडकीचा दरवाजातून चोरट्यांचा प्रवेश
कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनीत सूरज सुतार भाड्याने राहत आहेत. बंगल्यामध्ये सुतार कुटुंबीय एका बेडरुममध्ये झोपले होते, तर लहान बेडरुममध्ये सर्व साहित्य होते. मध्यरात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी खिडकीचे ग्रील उचकटून बंगल्यात प्रवेश केला. यावेळी सुतार कुटुंबीय गाढ झोपेत असल्याने त्यांना बाहेर काय सुरु आहे याचा अंदाज आला नाही. चोरट्यांनी बंगल्यामधील एका रुममध्ये प्रवेश करत 20 तोळे दागिन्यांवर डल्ला मारला. शेजारच्या बंगल्यातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार जवळपास तीन तास बंगल्यात चोरटे होते. रुममधील साहित्य विस्कटून आणि त्याठिकाणीच शौच करुन पोबारा केला. सकाळी सुतार कुटुंबाला जाग आल्यानंतर बंगल्यात चोरी झाल्याचे लक्षात आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस श्वानपथकासह दाखल झाले. ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.
'या' दागिन्यांची चोरी
सोन्याचे सहा तोळ्यांचे गंठण, दोन तोळ्यांचे गंठण, पाच ग्रॅमचे छोटे गंठण, पाच ग्रॅमचे तीन मणी मंगळसूत्र, नऊ ग्रॅमचे सोन्याचे वळे, आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅमची चौकोनी आकाराची अंगठी, 16 ग्रॅम वजनाच्या सहा अंगठ्या, चार ग्रॅमचे डूल, 15 ग्रॅमची कर्णफुले, पाच ग्रॅमचा सोन्याचा हार, चांदीच्या दागिन्यांमध्ये मोदकाचा हार एक, जास्वंद हार एक, साखळी हार एक, तोडे जोड एक, बाजूबंद जोड एक, पणती मोदक दोन, उंदीर एक असे मिळून अंदाजे एक किलो वजनाचे चांदीचे दागिने, एक मोपेड चोरट्याने लंपास केली.
तीन तास बंगल्यात संचार
शेजारील बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. दोन ते तीन चोरटे मध्यरात्री एकच्या सुमारास बंगल्यात घुसले. त्यानंतर चारच्या सुमारास ते बाहेर पडले. त्यामुळे चोरटे बंगल्यात सुमारे तीन तास असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या