हातकणंगले, कोल्हापूर : आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणण्यात आल्यानंतर पोलिसांच्या परवानगीने (Kolhapur Police) स्पेशल ट्रिटमेंट दिल्याचा प्रकार उघडकीस आला. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात गोरक्षकाचा पाठलाग करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चार संशयितांना पेठवडगाव पोलिसांकडून विशेष ट्रीटमेंट पुरवण्यात आली. न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या संशयितांना वैद्यकीय चाचणीसाठी कोल्हापुरात (Kolhapur Crime) सीपीआरमध्ये आणले असता, पोलिसांच्या परवानगीने मोबाईल पुरवण्यात आला. त्यामुळे पोलिसांसमोर थाटामध्ये संशयित मोबाईलवर गप्पा मारत होते. बुधवारी संध्याकाळी घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


संशयितांच्या मोबाईलवरून गप्पा 


चार दिवसांपूर्वी किणी टोल नाका येथे एका गोरक्षकास तीन ते चार जणांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पेठवडगाव पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर कारागृहात सोडण्यापूर्वी संशयितांना बुधवारी वैद्यकीय चाचणीसाठी सीपीआरच्या अपघात विभागात आणले होते.


सीपीआरमध्ये पोहोचताच संशयितांना नातेवाईक आणि मित्रांनी गराडा घातला. पोलिसांच्या परवानगीने संशयितांना मोबाईल उपलब्ध झाले. वैद्यकीय चाचणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संशयितांच्या मोबाईलवरून गप्पा सुरू होत्या. बेड्या घातलेल्या संशयितांना पोलिसांकडून मिळत असलेली विशेष ट्रीटमेंट पाहून उपस्थित आश्चर्यचकित झाले. त्यामुळे पोलीस कोठडीत चौकशी झाली की, नुसताच फार्स करण्यात आला, अशी शंका उपस्थित झाली आहे. घडल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांकडून पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने चूक झाल्याचे मान्य केले. 


अल्पवयीन मुलींचे अपहरण अन् अत्याचार; दोन आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी


दरम्यान, कोल्हापुरात एक आठवडाभरापूर्वी तीन महाविद्यालयीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून मद्य पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपाखाली दोन नराधमांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि साडे आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. नोव्हेंबर 2018 मध्ये आरोपींनी कोल्हापुरातून मुलींचे अपहरण केल्यानंतर इस्लामपूरमध्ये (ता. वाळवा, जि. सांगली) लैंगिक अत्याचार केला होता. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी बालिकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत आरोपींना शिक्षा सुनावली. हर्षल आनंदा देसाई (वय 24, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रमोद हणमंत शिंदे (वय 24, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन आहे. त्याच्यावर बालहक्क न्यायालयात खटला सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या