कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी बंडखोरांचा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर शरद पवार येत आहेत. या दौऱ्यात अजित पवार गटाच्या गळाल्या लागलेल्या हसन मुश्रीफांविरोधात रणशिंग फुंकणार का? याचीच चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सावलीप्रमाणे शरद पवार यांना साथ दिलेल्या हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या जाळ्यात अडकल्याने राजकीय कूस बदलताना अजित पवारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद देण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांनी बंडखोरीनंतर छगन भुजबळांप्रमाणे कोणतीही जहाल वक्तव्ये केलेली नाहीत. त्यामुळे शरद पवार मुश्रीफांविरोधात थेट भूमिका घेणार की? अन्य पर्याय देणार? याची उत्सुकता आहे.
बाईक रॅलीद्वारे शरद पवार यांचे जोरदार स्वागत होणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार कोल्हापुरात येत आहेत. दसरा चौकात त्यांची सायंकाळी चार वाजता जाहीर सभा होईल. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती असतील. या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे शरद पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात येईल.
कागल सोडून कोल्हापुरात राष्ट्रवादी शोधायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान दोन्ही आमदार हसन मुश्रीफ आणि चंदगडचे राजेश पाटील अजित पवार गटात आहेत. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटीलही त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवारांचे खंदे समर्थक व्ही. बी. पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे स्थान कागल तालुक्यापुरतेच मर्यादित राहिल्याने इतर ठिकाणी नेतृत्व शोधण्याची वेळ आली आहे. मुश्रीफ यांच्याकडून दुसऱ्या फळीतील नेतृत्व तयार करण्यात न आल्याने पक्षाच्या विस्तारावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनीही मागील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात झाडाझडती घेत कागलबाहेर राष्ट्रवादी नेण्यासाठी कानपिचक्या दिल्या होत्या.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये फुटीर अजित पवार गटातील हसन मुश्रीफ गटाचेच वर्चस्व आहे. त्यामुळे शरद पवार निष्ठावंतांवर पक्षविस्ताराचे आव्हान आहे. व्ही. बी. पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून जिल्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पक्षाकडे आजघडीला मोठा चेहरा नाही. मात्र, शरद पवार यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग असल्याने या दौऱ्यातून नवीन पायाभरणी करतात का? याकडेही लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या