Kolhapur Crime : दीड वर्षांनी जेलमधून सुटल्यानंतर 36 तासांत पुन्हा चोरी; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
चोरीच्या गुन्ह्यात कळंबा जेलमध्ये दीड वर्षांची शिक्षा भोगून जामीनावर बाहेर आल्यानंतर 36 तासांमध्ये पुन्हा चोरी करणाऱ्या अट्टल सराईताच्या कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) मुसक्या आवळल्या आहेत.
Kolhapur Crime : चोरीच्या गुन्ह्यात कळंबा जेलमध्ये दीड वर्षांची शिक्षा भोगून जामीनावर बाहेर आल्यानंतर 36 तासांमध्ये पुन्हा चोरी करणाऱ्या अट्टल सराईताच्या कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) मुसक्या आवळल्या आहेत. सराईत गुन्हेगार संतोष नारायण जाधव (वय 34 वर्षे, रा. वेताळ पेठ, इचलकरंजी) याने जामिनावर बाहेर आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पुन्हा चोरी केली. पोलिसांनी चोरीचा छडा लावताना संतोषला जेरबंद केलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सतरा वर्षांचा असल्यापासून चोरीचा नाद
पोलिसांनी (Kolhapur Crime) दिलेल्या माहितीनुसार संतोष हा सराईत चोरटा आहे. वयाच्या सतराव्या वर्षापासून त्याने चोऱ्या केल्या आहेत. राजारामपुरीमधील एका मंगल कार्यालयात चोरी केल्यानंतर त्याला शिक्षा झाली होती. तब्बल 22 महिने कळंबा जेलमध्ये हवा खाल्यानंतर 21 फेब्रुवारीला तो जामीनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने गुरुवारी (23 फेब्रुवारी) मंगळवार पेठेतील एका नर्सिंग होममध्ये पर्स आणि मोबाईल चोरला. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशन तपासून संतोषला अटक केली.
चोरीतील दोन मंगळसूत्र, अंगठ्या, कर्णफुले, रोख रक्कम आणि मोबाइल असा 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह परशुराम गुजरे, सतीश बांबरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, प्रीतम मिठारी, अमर पाटील आदींनी ही कारवाई केली.
जेलमध्ये शिक्षा भोगत असताना टोळी करुन घरफोड्या
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) मागील आठवड्यात चोऱ्या करुन सोने विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून 14 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. या चोरट्यांनी कोल्हापूरसह (Kolhapur Crime) महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात त्यांनी चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. राजू सल्वराज तंगराज (वय 37 वर्षे, रा. कारगल, ता. सागरा, जि. शिमोगा, कर्नाटक) आणि भीमगोंडा मारुती पाटील (वय 29 वर्षे, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, अटक केलेले चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी दहा गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या गुन्ह्यांमध्येच बेळगाव कारागृहात शिक्षा भोगत असताना गुन्हेगारांची टोळी तयार झाली. जून 2022 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा घरफोड्यांचे काम सुरु केल्याची माहिती निरीक्षक वाघमोडे यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या