Kolhapur Rain Update : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur News) मान्सून पावसाने जोर पकडल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उभ्या खरीप पिकांनी जीवदान मिळाले आहे. तसेच जिल्ह्यातील धरणांमध्येही वेगाने पाण्याची आवक सुरु झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणातील पाण्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या राधानगरी धरणात 59 टक्के पाणीसाठा झाला आहे. काळम्मावाडी धरणाच्या पाण्यामध्येही दोन दिवसांत चांगली वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पातळी आज (19 जुलै) सकाळी सातपर्यंत 21 फुट 9 इंचावर पोहोचली आहे. पंचगंग नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली 


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संततधार सुरु असल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 8 नद्यांवरील 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.


कोणते बंधारे पाण्याखाली?



  • पंचगंगा नदी - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ 

  • भोगावती नदी - हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे 

  • कासारी नदी - यवलूज 

  • हिरण्यकेशी नदी - साळगाव 

  • घटप्रभा नदी - पिळणी, बिजूर भोगोली, हिंडगाव, कानर्डे-सावर्डे 

  • वेदगंगा नदी  - निळपण, वाघापूर 

  • कुंभी नदी - कळे, शेनवडे

  • वारणा नदी - चिंचोली, पाणगाव  


धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी, पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु


दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांपैकी 5 धरणातून विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणातून सध्या 700 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. वारणा धरणातून 400 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. चंदगड तालुक्यातील घटप्रभा प्रकल्प पूर्वीच भरला असल्याने मोठा विसर्ग सुरु आहे. धऱणातून 4 हजार 765 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कोदे प्रकल्पातून 1144 क्युसेकने विसर्ग सुरु आहे, तर जांबरे प्रकल्पातून 130 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 


सहा तालुक्यांमध्ये दमदार पाऊस 


गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, चंदगड, आजरा आणि गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. चंदगडमध्ये सर्वाधिक पाऊस झाला.


इतर महत्वाच्या बातम्या