Kolhapur Crime: रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रत्यय कोल्हापुरात (Kolhapur News) एका हनीट्रॅप प्रकरणातून आला आहे. अगोदरपासून असलेल्या ओळखीतून फोनवर अश्लील बोलून फोटो व्हायरल करण्याची धमकी देतो म्हणून काटा काढण्यासाठी रचलेल्या हनीट्रॅपचा भांडाफोड झाला आहे. कोल्हापूर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. अटकेतील महिलेनेच हनीट्रॅप रचल्याचे समोर आले आहे. याबाबतची फिर्याद किरण पाटील (रा. जठारवाडी ता.करवीर) याने दिली होती.
कोमल कृष्णात पाटील (वय 29 रा. आकर्डे ता. पन्हाळा, इंद्रजित कृष्णात पाटील (वय 28 रा. आकुर्डे ता. पन्हाळा, नितीन पाडुरंग पाटील, (वय 32, रा.कोपार्डे ता. करवीर, मोहसिम चाँदसाब मुल्ला (वय 24, रा. कोपार्डे ता. करवीर, करण शरद रेणुके, (वय 23 रा. कोपार्डे ता. करवीर) यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेला माल, मोबाईल फोन आणि दोन हजार रुपये रोख रक्कम तसंच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकलीसह एकूण 1 लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना करवीर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
प्रकरण नेमके काय?
फिर्यादी किरण उत्तम पाटीलने इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेली शुभांगी नावाच्या मैत्रिणीला बालिंगा पाडळीमधील अविष्कार हायस्कूल या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावल्यानंतर 25 जून रोजी दुपारी गेला होता. यावेळी संशयितानी नंबर प्लेट नसलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा मोपेडवरुन येत किरण पाटीलच्या गाडीच्या आडवी लावत तू आमच्या बहिणीला मेसेज का करतोस? असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच किरणसोबत झटापट करुन, त्याचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम काढून घेत पळून गेले. यानंतर किरणने फिर्याद दिल्यानंतर करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तपासात झाला हनीट्रॅपचा भांडाफोड
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथक तयार करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या. संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी किरणच्या मोबाईलवर शुभांगी नावाची महिला इन्स्टाग्रामवर चॅटिंग करत होती. त्यास अनुसरुन सदरचे शुभांगी कदम नावाने सुरु असलेले इन्स्टाग्राम अकाऊंट कोणी सुरु केलं आहे याची तांत्रिक माहिती घेतली असता, हे फेक अकाऊंट कोमल कृष्णात पाटीलने शुभांगी कदम या नावाने सुरु केल्याची माहिती समोर आली.
या महिलेची माहिती घेतली असता, कोमल आणि फिर्यादी किरण पाटीलची पूर्वीपासून ओळख होती. किरण हा कोमलशी अश्लील बोलत होता. तसेच माझ्याकडे तुझे फोटो आहेत असे म्हणत ते व्हायरल करण्याची धमकी तिला देत होता. त्यामुळे कोमलने किरणचा काढा काढण्यासाठी संबंधित माहिती आपला दीर इंद्रजितला दिली. इंद्रजितने मित्र नितीन, मोहसिम आणि करण यांना दिली. इंद्रजितने शुभांगी नावाने सुरु केलेल्या फेक अकाऊंटवरुन किरणशी चॅटिंग सुरु केले. किरणला सुद्धा ही महिला शुभांगी असल्याचे वाटले. त्यामुळे भेटण्यासाठी गेल्यानंतर किरणशी झटापट करुन मारहाण केली. तसेच मोबाईल फोन आणि दोन हजार रुपये सुद्धा घेतले.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे नेतृत्वात शेष मोरे पोलीस उप निरीक्षक, पोहेकॉ सागर चांगले, प्रितम मिठारी, रणजित कांबळे, रफिक आवळकर, महिला पोलीस अमंलदार सुप्रिया कात्रट यांनी उघडकीस आणला.
इतर महत्वाच्या बातम्या