कोल्हापूर: जिल्ह्यातील चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे (Bidri Shree Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana Ltd) चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते केपी पाटील (K P Patil) यांच्यासाठी हा धक्का असल्याचं समजलं जातंय. या कारखान्याचे लेखापरीक्षण करण्यात यावं अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) गटाने केली होती. 


बिद्री साखर कारखानाच्या मागील पाच वर्षातील कामकाजाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याची मागणी कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले, अशोक फराकटे, बाबा नांदेकर आणि विजय बलुगडे यांनी तत्कालीन सहकार मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे केली होती. त्यानुसार साखर आयुक्तांना लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले होते. 


तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती


केपी पाटील यांच्या गटाकडून या कारखान्यामध्ये करण्यात आलेल्या कामकाजाबाबत एकूण 17 मुद्दे उपस्थित केले होते. या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये गंभीर स्वरूपाच्या बाबी उपस्थित झाल्या होत्या. त्यानुसार कारखान्यामध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालक यांनी आयुक्त साखर यांच्याकडे सादर केला होता. या प्राथमिक चौकशी अहवालास स्थगिती देण्याची मागणी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे चेअरमन के.पी.पाटील यांनी केली होती. त्यानुसार लेखापरीक्षणास तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. 


लेखापरीक्षणाचा अहवाल देण्याच्या सूचना


या स्थगितीच्या विरोधात दाद मागण्यासाठी बिद्री कारखाना बचाव कृती समिती शासन स्तरावर प्रयत्न करत होती. या प्रयत्नांना यश आले असून बिद्री कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश मंगवाळी विभागीय संचालक (साखर) यांना दिले आहेत. त्यामुळे कारखान्यामध्ये झालेल्या कामकाजाची सविस्तर चौकशी चाचणी लेखापरीक्षणामध्ये होणार असून हे लेखा परीक्षण करण्याकरिता डी.बी.पाटील विशेष लेखापरीक्षक वर्ग- 1 यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्वरीत लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. 


या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी आमदार प्रकाश आबिटकर गटाचे ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव, माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, दत्तात्रय उगले, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, सूर्याजीराव देसाई, बाबा नांदेकर, अशोकराव फराकटे,  विजय बलुगडे, शामराव भावके, विश्वनाथ पाटील, अशोकराव भांदीगरे, बाळासाहेब भोपळे आदी यांनी केली होती.


ही बातमी वाचा: