Shahu Maharaj Meet Manoj Jarange : आंतरवाली सराटी, जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला आहे. जालन्यातील (Jalna) आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. अशातच आज (मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023) कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी आंरवाली सराटीत उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांना शब्द देत, राजांचा मान राखून दोन दिवस पाणी पिणार, दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा पाणी सोडणार, असं म्हटलं आहे. 


शाहू महाराज छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट घेतली आणि सर्व मराठा आंदोलकांना त्यांनी आवाहन केलं आहे. एकाही मराठ्यानं आत्महत्या करू नये, असं शाहू महाराजांनी म्हटलं आहे. शाहू महाराज सोबत तर कोणाचीही भीती नाही, असं मनोज जरांगेही म्हणाले आहेत. तर शाहू महाराजांचा मान राखत जरांगेंनी दोन दिवस पाणी पिणार असल्याचंही सांगितलं आहे. 


राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना राज्यभरातून अनेक नेते श्रीमंत शाहू महाराजांनी आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. छत्रपती घराण्यातील माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी भेट घेतल्यानंतर आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांनी सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, असं स्पष्टच सांगितलं. तसेच, तब्येतीची काळजी घेण्याची विनंती मनोज जरांगेंना शाहू महाराजांनी केली. 



आंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतल्यानंतर छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले?



  • मनोज जरांगे यांचा निर्धार आहे, सर्व जनता त्यांच्या  मागे आहे

  • मनोज जरांगे यांना माझ्या शुभेच्छा

  • मराठा समाजने मनोज जरांगे यांच्या मागे उभे राहिले पाहिजे

  • जाळपोळ कोण करतेय हे मला माहीती नाही, पण आंदोलन शांततेत झाले पाहिजे जेणे करून समाजाला ठपका लागेल

  • आत्महत्या करून काही होणार नाही, आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही

  • आपले ध्येय आणि धोरण काय हे लक्षात ठेवून काम सुरू ठेवले पाहिजे,

  • सरकार सर्व मागण्या मान्य करेल अशी अपेक्षा आहे

  • इतर जिल्ह्यातून जरांगे यांना पाठिंबा आहे

  • मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे


दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी फोनवरुन चर्चा केली. तसेच, जरांगेंच्या तब्ब्येतीची संभाजीराजेंनी चौकशीही केली. मनोज जरांगेंना निदान पाणी तरी घ्यावं अशी विनंतीही संभाजीराजे छत्रपतींनी केली. तसेच, काळजी घेण्याचंही आवाहन संभाजीराजेंनी केलं. यापूर्वी आंतरवाली सराटीत जात संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती. 


काय म्हणाले संभाजीराजे?


छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची फोन वरून विचारपूस केली. आपण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत आहात, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण उपोषण करत आहात ठीक आहे परंतु आपण पाणी प्यावे अशी विनंती करत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.