कोल्हापूर : अजित पवार गटाची उत्तर सभा कोल्हापूरमध्ये रविवारी पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कोणतीही थेट टीका अजित पवार गटाकडून करण्यात आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ नाव न घेता गौप्यस्फोट केला. दुसरीकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना खोचक टोला लगावला होता. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी आज (11 सप्टेंबर) ट्विट करून जोरदार पलटवार केला आहे.
बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटले आहे की, कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
उत्तर सभेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, ज्यांना कोल्हापूरचे पायतान कसं आहे हे माहीत नाही ते पायतानाची भाषा करतात. ज्यांनी पायतणाची भाषा केली त्यांना मुश्रीफ साहेबांनी प्रेमाने जरी मिठी मारली तरी बरगड्या राहतील का? तत्पूर्वी, शरद पवारांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी कोल्हापुरी पायताणाचा वापर करावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि आव्हाडांमध्ये चांगलीच कलगीतुरा रंगला होता. त्याचाच संदर्भ देत मुंडे यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.
दरम्यान, धनंजय मुंडे सभेत बोलताना म्हणाले की, शरद पवार साहेबांची सभा झाली आणि लोक आम्हाला विचारू लागले उत्तर देण्यासाठी तुमची सभा होणार का? आम्ही सांगितलं की आमची सभा उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्व सभा होणार आहे. अजितदादा तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रिय होता आता तुम्ही लोकनेते देखील आहात. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत खालच्या भाषेत जाऊन टीका करणार असाल तर ते नागरीक कधी सहन करणार नाहीत. ज्यांना कोल्हापूरचे पायतान कसं आहे हे माहीत नाही ते पायतानाची भाषा करतात.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सर्व धर्मसमभावाचा व समतेचा विचार घेऊन आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही राज्य सरकारमध्ये काम करत आहोत. आम्ही सरकारमध्ये जाण्याची घेतलेली भूमिका ही कोणत्याही विचारांच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून केवळ सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी आहे, हे आम्ही सिद्ध करून दाखवू.
इतर महत्वाच्या बातम्या