कोल्हापूर : वाढलेल्या महागाईने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील ऊस ऊत्पादकांना दिलासा देण्यासाठी साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान 400 रूपयाचा दुसरा हप्ता देण्याबाबत कारखानदारांना आदेश करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (swabhimani shetkari sanghatana) करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करत लवकरच कारखानदारांना सुचना करू असे आश्वासन दिले. याबरोबरच 50 हजार रुपयाचे प्रलंबित अनुदान येत्या महिन्याभरात सर्वांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले. यंदा साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळाल्यामुळे साखर कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले आहेत, याकडे लक्ष वेधले आहे.
स्वाभिमानीकडून प्रोत्साहान अनुदान तातडीने देण्याची मागणी
महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्यात एफआरपी देण्याचा कायदा केला होता. हा कायदा बदलून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, अजूनही त्याचा शासन निर्णय झालेला नाही. संबधित शासन निर्णय होणेसदर्भात तातडीने निर्णय व्हावा, महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमाफी जाहीर केली आहे. या यादीतील नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50 हजार रूपये कागदपत्रांची पूर्तता होऊनही मिळालेलं नाही. त्यामुळे हे अनुदान तातडीने मिळावे आणि दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान येणे बाकी असून सदरची फक्त घोषणाच झाली असून शासन निर्णय करणे गरजेचे असल्याकडे स्वाभिमानीकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) लक्ष वेधण्यात आले आहे.
राज्यातील कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करण्याची मागणी
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये राजरोसपणे काटामारीचे प्रमाण वाढले असून राज्यातील कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात आली आहे. वजन काटे ऑनलाईन करण्याबाबत मी आग्रही असून साखर कारखान्यांनी मॅनलेस वजनकाटे उभारावे. याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वीज बील भरणा करण्यात आघाडीवर असल्याने तो राज्याच्या वर्गवारीमध्ये ‘अ ‘वर्गात येत असल्याने विनाकपात वीज देण्याच्या सुचना महावितरणला करू असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष प्रा.डॅा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, जर्नादन पाटील, शैलेश आडके, सागर शंभुशेटे, सागर मादनाईक, आण्णा मगदूम आदी पदाधिकारी ऊपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या