कोल्हापूर : शरद पवारांची सभा कोल्हापुरात पार पडल्यानंतर आज (10 सप्टेंबर) अजित पवार गटाची उत्तर सभा झाली. हसन मुश्रीफ यांनी उत्तर सभेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना आणखी एक गौप्यस्फोट केला. तसेच ईडीच्या भीतीने भाजपला मांडीला मांडी लावून बसल्याची टीका होत असल्याने प्रत्युत्तर दिले. 


अजित पवारांनी कोणता गौप्यस्फोट केला?


अजित पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की, राज्याचा विकास कसा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत गेला नाही, लोकांची कामे करण्यासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही. आमच्याबद्दल चुकीचा मेसेज पसरवला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते त्यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत 52 आमदारांच्या सहीच पत्र दिलं होतं. हे जर खर नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. खरं असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? अशी विचारणा त्यांनी केली. 


तसेच सत्तेत सामील होण्यासाठी यशवंतराव चव्हाणांचा मार्ग वापरल्याचे म्हणाले. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनीही आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाणांचा संदर्भ देत आपला निर्णय कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. 


मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही


आमच्यावर दबाव होता तो काम करण्यासाठी होता, आमदारांना निधी देण्यासाठी दबाव होता, राज्याच्या कामासाठी दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद आहे, भाषण करून काम होत नाही त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार पुढे म्हणाले की, कोल्हापुरात होणारी उत्तरदायित्व सभा माझ्यासाठी महत्वाची आहे. कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे केंद्र कायम राहिलं आहे, बळीराजावरचं दुष्काळाचं सावट दूर करावं हे अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील अनेक भागात अजून म्हणावा तसा पाऊस नाही. कोल्हापूरतील सलोखा कुणी बिघडवत असेल तर सत्तेत असताना देखील आम्ही त्याला विरोध करु. 


आताच्या केंद्र सरकारने साखर कारखान्यांचा टॅक्स माफ केल्याचे सांगितले. याआधी कुणीही टॅक्स माफ केला नाही. असं झालं नसत तर सरकारी साखर कारखाने उद्धवस्त झाले असते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना एफआरी देताना होत होता. अडचणीत असलेले साखर कारखाने बाहेर काढले तर काय चुकले? असेही अजित पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या