Kolhapur News : गोकुळच्या माजी संचालिका जयश्री पाटील-चुयेकर यांचे निधन
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) माजी संचालिका जयश्री पाटील-चुयेकर (वय 78) यांचे निधन झाले. गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या त्या पत्नी होत.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) माजी संचालिका जयश्री पाटील-चुयेकर (वय 78) यांचे निधन झाले. गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या त्या पत्नी होत. श्रीमती जयश्री पाटील चुयेकर या 2015 ते 2020 या कालावधीत गोकुळच्या संचालिका होत्या. विद्यमान संचालक शशिकांत पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दुपारी एक वाजता चुये येथील स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, गोकुळचे विद्यमान संचालक शशिकांत पाटील, सहा मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
जयश्री पाटील माई या नावाने परिचित होत्या. गोकुळचे संस्थापक चेअरमन आनंदराव पाटील चुयेकर यांनी सामाजिक, सहकार, राजकीय क्षेत्रात जे भरीव काम केले त्यामध्ये जयश्री पाटील यांची खंबीर साथ होती. गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासून त्या साक्षीदार होत्या. जयश्री पाटील यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळात आनंदराव पाटील चुयेकर यांना भक्कम साथ दिली. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पश्चात त्यांनी 2015 मध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवली होती.
कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी श्रीमती जयश्री पाटील यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे, नावीद मुश्रीफ, अजित नरके, प्रकाश पाटील, सुजित मिंणचेकर, बयाजी शेळके, चेतन नरके यांनी अंत्यदर्शन घेतले. माजी आमदार के. पी. पाटील, गणपतराव फराकटे, उमेश भोईटे आदींनी चुयेकर कुटुंबियांचे सांत्वन केले.
इतर महत्वाच्या बातम्या