Kolhapur News : रस्त्यावरून जाताना आग दिसताच विझवायला गेला अन् गाडी जळाली, पण गावाने पैसे गोळा करून त्याच जागेवर दिली नवी गाडी!
Kolhapur News : मनात कोणताही स्वार्थ नसताना निर्मळ मनाने मदतीचा हात दिला म्हणून सर्व गावाने एकत्र येत पुन्हा पैसे गोळा करून युवकाला त्याच जागी नवी दुचाकी देत एक प्रकारे ऋण व्यक्त केले.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील नवकृष्णा व्हॅली स्कुलजवळ पॉलीहाऊसला लागलेली आग विझवण्यासाठी आणि मदतीसाठी गेलेल्या युवकाची गाडी त्याच आगीत जाळून खाक झाली होती. मात्र, मनात कोणताही स्वार्थ नसताना निर्मळ मनाने मदतीचा हात दिला म्हणून सर्व गावाने एकत्र येत पुन्हा पैसे गोळा करून युवकाला त्याच जागी नवी दुचाकी देत एक प्रकारे ऋण व्यक्त केले. ही घटना कोल्हापुरातील उत्तूर येथे घडली होती. गिरीश कुंभार असे त्या युवकाचे नाव आहे.
नेमका प्रसंग काय घडला होता?
1 मार्च रोजी आजऱ्यामधील गिरीश कुंभार हा युवक उत्तूर-गारगोटी रस्त्यावरून मित्राची गाडी घेवून पिंपळगावला जात होता. नवकृष्णा व्हॅली स्कुलजवळ दुपारी डोंगरावर वणवा लागला होता. यावेळी येथील तुषार घोरपडे यांच्या पॉलीहाऊसच्या खालील बांधाला असणाऱ्या गवताने पेट घेतला आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले होते. पाहता पाहता आग येथील तुषार घोरपडे यांच्या पॉलिहाऊसला लागली आणि मोठे नुकसान यावेळी होत असल्याचे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या गिरीशने कोणताही विचार न करता गाडी रस्त्याच्या बाजूला लावून मदतीसाठी धावून गेले आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र तोपर्यंत इकडे रस्त्याच्या काठाला असणाऱ्या गवताने पेट घेतला आणि या आगीत दुचाकी जळाली.
गावात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन
कुंभार यांच्या मित्राची गाडी असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे गिरीश कुंभारला नवीन गाडी घेऊन द्यायचे ठरले. कुंभार यांना गाडी घेण्यासाठी मदत व्हावी, यासाठी आरदाळ विद्यालयाचे शिक्षक किरण चव्हाण यांनी पुढाकार घेतला. गावात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले. बघता बघता दानशूर व्यक्तींनी पैसे दिले आणि पैसे गोळा झाले आणि समाजातील सर्व घटकांनी आर्थिक मदत करून लेखक नंदू साळोखे यांच्या हस्ते दुचाकीची चावी कुंभार यांना देण्यात आली. दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून गेलेल्या युवकाला नवी गाडी घेण्यासाठी समाजातून मदत झाली. त्यामुळे ज्या जागेवर दुचाकी जळाली त्याच जागेवर नवीन दुचाकी देण्यात आली. यावेळी सागर गुरव, शिवाजी सुतार, जहांगीर नाईकवाडे,आर.के.पाटील, विशाल वडवळे, ग्रामसेवक बारदेस्कर व नागरिक उपस्थित होते. प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांनी आभार मानले.
इतर महत्वाच्या बातम्या