Kolhapur Ganesh 2022 : कोल्हापूर जिल्ह्यासह कोल्हापूर शहरामध्येही घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरवासिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुर्तिदान झालेल्या 55 हजार 344 मुर्ती इराणी खाणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. इराणी विभागीय कार्यालय व नागरिकांडून अर्पण केलेल्या मुर्ती महापालिकेने यावर्षी प्रथमच बसविलेल्या स्वयंचलित यंत्राद्वारे खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या.


महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरिकांनी पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विर्सजित न करता महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्ये व इराणी खाणीत विसर्जित केल्या. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून 180 विसर्जन कुंडाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळांनी, तालमींनी व संस्थांनीही काहीली, कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते.


मनपाची सर्व यंत्रणा कार्यरत 


घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजेपर्यंत काम करत होती. यामध्ये पवडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य विभागाचे 650 कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या 16 टीम, 90 टँम्पो 200 हमालांसह, 10 डंपर, 24 ट्रॅक्टर ट्रॉली व 5 जेसीबी 7 पाण्याचे टँकर, 2 रोलर, 2 बुम अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. 


पवडी विभागाकडून नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेशमूर्ती टेम्पोमधून नेऊन इराणी खाणीमध्ये विसर्जित करणेचे व्यवस्था केली होती. याचबरोबर महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षीततेसाठी साधनसामुग्रीसह तैनात करण्यात आले होते. तसेच विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्थाही करण्यात आली होती. 


नागरिकांनी अर्पण/फेर विर्सजन केलेले निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 16 आरोग्य निरिक्षकांच्या टीम व एकटी संस्थेच्या 100 महिला सदस्य निर्माल्य संकलित केले. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 650 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 


निर्माल्याचे सेंद्रीय खत होणार 


संकलित करण्यात आलेले निर्माल्य पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पिटल येथे स्वतंत्र खड्डा करुन सेंद्रीय खत तयार करण्यासाठी जमा करण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत कुंड ठवलेल्या ठिकाणांची, पंचगंगा नदीजवळी गायकवाड पुतळा परिसर व इराणी खण परिसराची स्वच्छताही करण्यात आली. नागरिकांनी अर्पण केलेले 135 मेट्रिक टन निर्माल्य 9 डंपर व 3 ट्रॅक्टरद्वारे पहाटे 6 वाजेपर्यत गोळा करण्यात आले. 


मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलवडे यांनी नागरिकांना गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपूरक, गर्दी टाळून महापालिकेने पर्यायी व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गांधी मैदान विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण 11231, छ.शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण 10335, राजारामपुरी विभागीय कार्यालय अंतर्गत एकूण 9440, तर ताराराणी विभागीय कार्यालया अंतर्गत एकूण 7640 गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यात आले. 


शहरातून व ग्रामीण भागातून आलेल्या 16698 मुर्ती नागरिकांनी थेट इराणी खण येथे विसर्जित करण्यात आल्या. याव्यतिरिक्त काही नागरीकांनी गणेशमूर्ती घरीच बादलीमध्ये विसर्जित केल्या. 


सदरचे नियोजन प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे, अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक आयुक्त संदिप घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशनम अधिकारी तानाजी कवाळे, विद्युत अभियंता अमित दळवी, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, सहा.अभियंता चेतन शिंदे यांनी केले.


इतर महत्वाच्या बातम्या