Kolhapur Expansion : कोल्हापूर शहर हद्दवाढीसाठी राजकीय पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची आज मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत बैठक होत आहे. या बैठकीमध्ये चांगलेच घमासान होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरात हद्दवाढीवरून दोन गट पडले आहेत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याने परस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
आज 4 वाजता ही बैठक होणार आहे. हद्दवाढीसाठी आक्रमक असलेल्या हद्दवाढ कृती समितीने विरोध करणाऱ्या ग्रामीण भागांमधील केएमटी मार्ग बंद करण्याची मागणी केली आहे. समितीने केएमटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत 24 पैकी 20 मार्ग तोट्यातील असून त्यात ग्रामीणमधील मार्गांचा समावेश आहे. ग्रामीणचे नागरिक हद्दवाढीत यायला नकार देत असतील, तर त्यांना महापालिका देत असलेली सुविधा बंद करावी, अशी मागणी समितीने केली होती.
ग्रामीणमधील मार्ग बंद करा अशी मागणी केली होती याबाबत प्रशासकांकडे प्रस्ताव पाठवला जाईल, असे आश्वासन अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी दिले होते. मात्र त्यावर कृती झालेली नाही. त्यामुळे या मुद्यावरून बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. या मुद्यावरून तसेच हद्दवाढीच्या प्रस्तावाला चालना देण्याबाबत कोणती रणनीतीचा अवलंब करायचा याबबतही या बैठकीत खल होण्याची शक्यता आहे. कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदुलकर यांनी हद्दवाढीबाबत शहरातील राजकीय पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती.
विरोधी समितीही निवेदन देणार
दरम्यान, हद्दवाढविरोधी समितीकडून प्रशासक डॉ. बलकवडे यांना उद्या दुपारी तीन वाजता निवेदन देणार आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित राहणार आहेत.
तर कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा तीन मिनिटांमध्ये निकालात!
कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. गेल्या 50 वर्षांपासून कोल्हापूरची इंचभरही हद्दवाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर हद्दवाढीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्याय सांगितला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी 30 ऑगस्ट रोजी हद्दवाढीवर भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हद्दवाढीचा निर्णय पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पटवून सांगितले, तर हा निर्णय 3 मिनिटांत संपून जाईल. शहरातील नेते आणि ग्रामीण भागातील नागरिक यांनी हातात हात घालून चालले पाहिजे. जर ग्रामीण भागातील नागरिकांना न समजवता निर्णय घेतला तर यादवी होईल, वाद निर्माण होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.