Kolhapur Shahi Dasara : म्हैसूरनंतर संस्थानकालीन दसरा परंपरेची साक्ष देणारा शाही सोहळा हा कोल्हापुरात पार पडत असतो. राजघराण्यातील श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह संपूर्ण कुटूंब आणि मान्यवर या शाही दसरा सोहळ्यात सहभागी होत असतात.


कसा होतो करवीर संस्थानचा शाही दसरा सोहळा?


दसऱ्याला राजा आणि प्रजा यांच्यातील अंतर दूर होऊन भावबंध जुळतात. विजयादशमीच्या दिवशी भवानी मंडपातून शाही मिरवणुकीला सुरुवात होते. तुळजा भवानीची पालखी, श्री गुरुमहाराज यांची पालखी आणि अंबाबाईची पालखी अशा तीन पालख्या कोल्हापूर शहरातील दसरा चौकात एकत्रित येतात.


निमंत्रितांसह मानकरी आणि नागरिकांना बसण्यासाठी आलिशान शामियाना उभारला जातो. याचवेळी ‘मेबॅक’ या विदेशी बनावटीच्या मोटारीतून न्यू पॅलेसवरून शाही घराण्यातील श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, शहाजीराजे आणि यशराजे शाही लवाजम्यासह येतात. त्यांचे बॅण्ड पथकाने स्वागत करण्यात येते. त्यांच्या हस्ते चौकातील शमीच्या पानांचे पूजन होते. त्यानंतर सोने लुटण्याचा थरार दसरा चौक अनुभवतो. मावळत्या सूर्याच्या साक्षीने करवीरनगरीचा पारंपरिक शाही दसरा सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होतो. 


चौपाळ्याचा माळ म्हणजेच आताचा दसरा चौक


पूर्वी कोल्हापूरची हद्द टाऊन हॉलपर्यंत होती. तिथून पुढे न्यू पॅलेसपर्यंत माळ होता. तो चौपाळ्याचा माळ म्हणून ओळखला जात असे. येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात चाफ्याची झाडे होती. त्यामुळे त्याला चौपाळ्याचा माळ म्हणत होते. लुटलेले सोने एकमेकांना देत ‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ अशा शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांसह सारे करवीरवासीयांकडून सोने स्वीकारत अंबाबाई मंदिराकडे जातात. देवीचे दर्शन घेऊन ते राजवड्यात परत जातात.


ऐतिहासिक दसरा चौक तब्बल दोन वर्षांनी गर्दीचा रोमांच अनुभवणार


यंदाच्या सोहळ्यामध्ये शासनाचाही सहभाग असल्याने दसरा आणखी सोनेरी होणार आहे. त्यामुळे यंदा शाहू महाराज राजघराणे आणि जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी दिवसभर तयारीची लगभग सुरु होती. मुख्य चौकात लकडकोट बांधणी, ध्वजासह शामियाना उभारणी करण्यात आली आहे. आज सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी शमीपूजन सोहळा शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. शमीचे पूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. मैदानाच्या मध्यभागी लकडकोट बांधण्यात आला आहे. दरम्यान, दसरा चौकातील सोहळा पाहण्यासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. 


सोहळ्यानंतर परंपरेनुसार अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगर, शुक्रवार पेठ, पंचगंगा तालीम, गंगावेस परिसरातून फिरून पुन्हा मंदिरात जाईल. दरम्यान, यंदाच्या शाही दसरा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरावा, यासाठी पारंपरिक लवाजम्याबरोबरच भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या