Kolhapur Shahi Dasara : ऐतिहासिक आणि देदीप्यमान परंपरा असलेल्या कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. पुढील वर्षांपासून या सोहळ्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव शासनाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 


दीपक केसरकर यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा महोत्सव जगभरात पोहोचावा या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. पुढील वर्षीपासून विविध माध्यमातून एक कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. 


कोल्हापूर ही आंतरराष्ट्रीय पर्यटन नगरी बनण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थानच्या संस्थापक ताराराणी, सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची परंपरा आणि करवीरनिवासिनी अंबाबाईच्या प्रती असलेली भक्ती यांचा संगम म्हणजे कोल्हापूरचा दसरा. राजघराण्यामार्फत साजरा केला जाणारा हा सोहळा शासनामार्फत दरवर्षी दिमाखात साजरा केला जाणार आहे. 


कोल्हापूर संस्थानमार्फत छत्रपतींच्या परंपरा जपल्या जात आहेत. त्या यापुढेही जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे केसरकर यांनी सांगितले. यावर्षी या दसरा महोत्सवासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळाचे त्यांनी आभार मानले. पुढील वर्षीपासून अतिशय भव्य स्वरूपात हा उत्सव साजरा केला जाईल.


इतर महत्वाच्या बातम्या