Ambabai Mandir Navratri : तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम मोडित निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच जिल्हा  प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये 25 लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील अशा अंदाजाने नियोजन केले होते. प्रत्यक्षात अंबाबाई मंदिरात नवरात्रीमध्ये 23 लाख 31 हजार 604 भाविकांनी भेट दिली.


देवस्थान समितीकडून ऑनलाईन दर्शनाची सुद्धा सोय करण्यात आली होती. या माध्यमातून 42 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. दुसरीकडे सप्तमीला अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीकडून 7 लाख 73 हजार 721 भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा करण्यात आला. तथापि, या आकड्यावरून मत मतांतरे आहेत. कारण तीन लाखांवर भाविक गेल्यानंतर कोल्हापूरमध्ये करण्यात आलेली 12 ठिकाणची पार्किंग व्यवस्था कोलमडली होती. शहरातील वाहतुकीवरही ताण निर्माण झाला होता. त्यामुळे त्या दिवशीच्या आकडेवारीबाबत साशंकता आहे. 


13 लाख प्रसादाच्या लाडूंची विक्री 


अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवामध्ये 13 लाख प्रसादाच्या लाडूंची विक्री झाली.


अंबाबाईची नवमीला विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा


शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. गजानन मुनीश्‍वर आणि मुकुल मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली. गेल्या नऊ दिवसांपासून विविध रुपात अंबामातेची पूजा बांधण्यात आली. 


अंबामातेची नऊ दिवसांमध्ये खालील स्वरुपात पूजा बांधण्यात आली 



  • पहिल्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची सिंहासनारूढ या रूपात पूजा बांधण्यात आली.

  • द्वितीय माळेला अंबाबाईची दुर्गा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.

  • तृतीय माळेला अंबाबाईची सिद्धीदेवी रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली.

  • चौथ्या माळेला अंबाबाईची मदुराई निवासिनी मीनाक्षीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली.

  • ललिता पंचमीला करवीर निवासिनी अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली.

  • सहाव्या माळेला अंबाबाईची भक्ती मुक्ती प्रदायिनीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.

  • सप्तमी तिथीला अंबाबाईची शाकंभरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.

  • अष्टमी तिथीला महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली.

  • नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली.   


इतर महत्वाच्या बातम्या