Varad Patil Murder Case : कागल तालुक्यातील डॉक्टर रवींद्र पाटील यांचा मुलगा वरद पाटील अपहरण व खून खटल्याच्या सुनावणीला आजपासून प्रारंभ होत आहे. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांच्यासमोर होणार आहे. राज्याच्या गृह विभागाने मुंबई उच्च न्यायालयाचे वकील उमेशचंद्र यादव यांची सात वर्षीय वरदचे अपहरण आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.


बेपत्ता चिमुरडा वरद ऑगस्ट 2021 मध्ये तलावात मृतावस्थेत आढळला होता. तो आपल्या वडिलांसोबत आजोबांच्या घरी वास्तूशांतीसाठी समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता. संशयित दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्यने 17 ऑगस्ट 2021 रोजी सावर्डे बुद्रुकमधून आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या नव्याने बांधलेल्या बंगल्यातून चिमुरड्या वरदचे अपहरण करून खून केला होता. सुरुवातीला हे प्रकरण नरबळी असल्याची चर्चा रंगली होती. कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने खुनाचा छडा लावत मारेकऱ्याला जेरबंद केले होते. 


या खुनाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, तत्कालीन पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्यासह पथकाने केला होता. आरोपीविरुद्ध 16 डिसेंबर 2021 रोजी 199 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. आरोपी मारुती वैद्यने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर आरोप निश्चिती होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या