कोल्हापूर: कोल्हापुरातील  (Kolhapur News) सीपीआर अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असे रुग्णालय बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली. सीपीआरमधील अतिविशेष उपचार सुविधेचे लोकार्पण तसेच बधिरीकरण यंत्राचे अनावरण मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ यांनी सीपीआरला भेट देऊन सुरु असलेल्या बाह्यरुग्ण सेवांचा सविस्तर माहिती फलक लावण्याची सूचना या भेटीदरम्यान केली होती. या बाह्यरुग्ण सेवा डॅशबोर्डचे अनावरणही मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली सीपीआर रुग्णालयामधील रुग्णसेवेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. एक सप्टेंबरपासून होमिओपॅथी बाह्य रुग्णसेवेचीही याठिकाणी सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सीपीआरमध्ये मधुमेह, थाईरॉईड, संधीवात आणि स्थुलता गुंतागुंतीच्या आजारावर उपचाराची सुविधा नव्याने सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.


मुश्रीफ यांनी सांगितले की, रिक्त पद भरतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. सीपीआर ही हेरिटज वास्तू असून सीपीआरसह अंतर्गत वास्तूंची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 48 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रक्तदान शिबिरासाठी सुसज्ज रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय व नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस मिळाव्यात, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी केली असता याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण आणि कर्नाटक राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण सीपीआरमध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सीपीआरला आवश्यक ते मनुष्यबळ आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्री देण्यासाठी प्रयत्नशील आहे.


सीपीआरमध्ये अतिविशेष उपचार तज्ज्ञ डॉक्टरांची बाह्यरुग्ण सेवा सुरु 


सद्यस्थितीत मधुमेह, थायरॉइड आणि स्थूलता इत्यादी रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. या आजारांवर उपचार करण्याऱ्या अतिविशेष उपचार तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून या आजारांवर उपचार करणाऱ्या अतिविशेष उपचार तज्ञ डॉक्टरांची बाह्यरुग्ण सेवा सुरु करण्यात आली. या सेवेचा लाभ संबंधित रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी  घ्यावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. गंभीर आणि गुंतागुंतीचे आजार असल्यास उपचारासाठी नियमित डॉक्टरांकडून उपचार केले जात होते. अशा स्थितीत सीपीआरमध्ये तिन्ही आजारावरील स्वतंत्र उपचार कक्ष तसेच तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मागणी केली होती. त्याची दखल वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी घेतली. 


इतर महत्वाच्या बातम्या