Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी झालेल्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्याच्या बैठकीचं काही मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं. ते कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मी बैठकीला गेला हे मान्य करतो. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे अजित पवार म्हणाले. 


मी कुठेही लपून गेलो नाही 


मी कुठेही लपून गेलो नाही असेही अजित पवार म्हणाले. मी कधी लपून गेलो सांगा ना? असा सवाल अजित पवारांनी केला. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया हे पवारसाहेबांचे क्लासमेट आहेत. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवारसाहेब यांच्यासोबत होते असे अजित पवार म्हणाले. दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाणे काय चुकीचे? असेही अजित पवार यावेळी म्हणाले. मी नात्यानं शरद पवार यांचा पुतण्या लागतो. त्यामुळं कारण नसताना याला काहीजण वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देत आहेत. त्यातून समज गैरसमज निर्माण होत आहेत. 


 



मी उथळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता 


दरम्यान, शरद पवार यांनी भेटताना मी ज्या गाडीत होतो, त्या गाडीचा अपघात झालाच नव्हता असे स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी दिले. मी उथळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता मला लपून जाण्याचे कारण काय? असेही अजित पवार म्हणाले. 


पुण्यात नेमकं काय घडलं होतं? 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते. त्या ठिकाणी त्यांनी जेवणही केलं. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते अशी चर्चा आहे. त्याचवेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसवर न जाता दुसऱ्याच गाडीने चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये यावेळी दीर्घ चर्चा झाल्याचं स्पष्ट होत आहे. संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडले. त्याच्यानंतर सव्वा सहा ते साडे सहाच्या सुमारास जयंत पाटील हे त्या ठिकाणाहून बाहेर पडल्याचं समोर आलं. त्यानंतर 6.40 मिनिटांनी अजित पवार हे या ठिकाणाहून बाहेर पडले. 


Ajit Pawar : मोठी बातमी! पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची गुप्त भेट