कागल (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा महाब्रँड आहे. परंतु, प्रसंगी तोटा सहन करून गोकुळ ब्रँडला मोडायचे आक्रमक कारस्थान अमूल दूध करीत आहे, अशा परिस्थितीत गोकुळचे वैभव टिकवायचे असेल तर गांभीर्याने घ्या. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत म्हशीच्या दुधात पाच लाख लिटर वाढ झालीच पाहिजे, ही शपथ घेऊया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले.
मुश्रीफ आज (18 सप्टेंबर) कागल तालुक्यातील व्हन्नूरमधील श्री.हनुमान दूध संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुणराव डोंगळे होते. यावेळी मुश्रीफ यांनी गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेला गोंधळ आणि हुर्रेबाजीचा चांगलाच समाचार घेतला.
"गोकुळ दूध संघाची अब्रू राज्याच्या वेशीवर टांगणे आता बंद करा"
मुश्रीफ यावेळी बोलताना म्हणाले की, "दुधधंदा आता दुय्यम राहिलेला नाही. तो शेतकऱ्यांचा मुख्य झाला आहे. गोकुळ दूध संघ सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. वार्षिक सभेतील घोषणाबाजी आणि गोंधळ यातून गोकुळ दूध संघाची अब्रू राज्याच्या वेशीवर टांगणे आता बंद करा. गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांच्या, उत्पादकांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी असते."
ते पुढे म्हणाले की, "गोकुळच्या म्हशीच्या दुधाला पुणे, मुंबईसह महाराष्ट्रभर मोठी मागणी आहे. म्हशीच्या दूध संकलनामध्ये पाच लाख लिटर दुधाची वाढ अपेक्षित आहे. त्यासाठी एक हजार निवडक शेतकरी शोधून,त्यांना प्रत्येकी दहा म्हशींसाठी अर्थपुरवठा करावयाचा व अनुषंगिक सेवा सुविधा द्यायच्या, ही अशी सूचना मी संचालक मंडळाला केली असल्याचे त्यांनी सांगितले." गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुणराव डोंगळे म्हणाले की, "2007 साली स्थापन झालेल्या या संस्थेने स्वबळावर इमारत बांधली आहे. या संस्थेची वाटचाल अतिशय कौतुकास्पद आहे."
यावेळी व्यासपीठावर सरपंच पूजा मोरे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, पंचायत समिती सदस्य रमेश तोडकर, गोकुळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी.डी.पाटील, नेताजीराव मोरे, राजाराम खोत, उपसरपंच मंगल कोकणे, संस्थापक चेअरमन संभाजी खापणे, व्हाईस चेअरमन श्रावण वाडकर, राजाराम खोत, दिलीप जाधव, सुनील पांढरे, भालचंद्र यादव, राजाराम यादव, रघुनाथ कांबळे, सविता निकम, सर्जेराव खापणे, गुंडा पोवार, तातोबा खाडे, सुजाता जाधव, आनंदा खापने, सारिका संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या