कोल्हापूर : आमदारकीचे तिकिट नको, पण गोकुळचे संचालक पद द्या, अशी एक म्हण कोल्हापूरच्या सहकाराच्या राजकारणात आजही प्रचलित आहे. ज्या पद्धतीने कोल्हापूरच्या राजकारणात महाडिक आणि पाटील गटाच्या राजकारणाने टोक गाठले आहे. दोन्ही गट शड्डू ठोकून बिंदू चौकापर्यंत आले, अगदी त्याच पद्धतीने गोकुळच्या राजकारणात सुद्धा टोक गाठले गेले आहे. याचीच प्रचिती आज गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा आली. आजवरचा कुख्यात इतिहास पाहता सभा वादळीच होणार अशी चर्चा होती. सभा सुरू होण्यापूर्वीच हुल्लडबाजी सुरु झाली आणि पूर्णत: हुर्रेबाजीतच सभा पार पडली. हुर्रेबाजीने सभासदांच्या हाती काय पडले याचा विचार करण्याची वेळ आली आहे. 


दुध उत्पादक मरणासन्न अवस्थेत


जो सर्वसामान्य कधीच गोकुळकडे फिरकत नाही, त्याचा दिवसच शेणा मुतात आणि दोनवेळा धारा काढण्यात जातो तो सर्वसामान्य सभासद मात्र या विकृतीच्या राजकारणाने पार वैतागून गेला आहे. गोकुळच्या वार्षिक सभेला एका मिनिटात संपवणे, खुर्च्या बांधून घालणे, फेकीफेकी करणे असा कलंकच आजपर्यंत घृणास्पद राजकारणाने लागला आहे. लाखो लिटरने जिल्ह्यातील घटलेलं दुध संकलन, पशुधनाची वाढलेली किंमत, लम्पीमुळे झालेली जीवितहानी, त्यामुळे दुध संकलनावर झालेला परिणाम, वाढलेले पशुखाद्याचे दर, हिरव्या चाऱ्याची होत चाललेली वाणवा, दुधाला मिळत नसलेला अपेक्षित दर, दर दिल्यास होणारी पशुखाद्यातील वाढ यामुळे दुध उत्पादक मरणासन्न अवस्थेत गेला आहे. व्यवसाय करावा की करू नये? इतवर मानसिकता येऊन ठेपली असताना गोकुळच्या सभेत हुर्रेबाजीत करताना काहीच कसे वाटत नाही? असा संताप सर्वसामान्यांमधून उमटू लागला आहे.


प्रामाणिक सभासदांनी चिवड्याच्या पाकिटासाठीच यायचं का?


वार्षिक सर्वसाधारण सभेला ज्यांचा आणि विरोधकांच्या राजकारणात काडीचाही संबंध नसतो असे सभासद जिल्ह्यातून सभेला येत असतात. त्यांना फक्त आपल्या समस्यांवर, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्यांवर चर्चा होईल, अशी त्याची रास्त अपेक्षा असते. मात्र, सभेला यायचं आणि हुल्लडबाजी पाहून सभेची शेवटी हातावर ठेवलेली बर्फी आणि चिवडा घेऊन घर गाठायचे असाच पायंडा पडला आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्या उद्देशाने वार्षिक सभा व्हायला हवी, त्या उद्देशापर्यंत कधीच पोहोचलेली नाही. 


राजकीय धुणीभांडी करून घेण्यासाठी गोकुळ दुध आहे का?


दोन्ही बाजूने इर्ष्येने होणाऱ्या हुल्लडबाजीने जो मागे बसलेला प्रामाणिक सभासद असतो तो फक्त उघड्या डोळ्यांनी पाहतो. सत्ताधारी जेव्हा विरोधात होते तेव्हा वार्षिक सभेत गुंड आणले असा आरोप केला जात होता. आता सत्ताधारी बदलले आणि तेव्हाचे विरोधक आज सभेसाठी गुंड आणले जातात असा आरोप करत आहेत. त्यामुळे दुध उत्पादकांचे हित साधण्यापेक्षा गोकुळ राजकारणाचा अड्डा झाला आहे का? राजकीय धुणीभांडी करून घेण्यासाठी गोकुळ दुध संघाचा वापर होत आहे का? याचाही विचार करण्याची गरज आहे. ज्या गोकुळने जिल्ह्यात आणि सहकारात समृद्धी आणली, घरातील चुली पेटवल्या. दहा दिवसाला बिल देत अर्थकारण मजबूत केले तोच गोकुळ अक्षरश: राजकीय साठमारीचा अड्डा होऊन गेला आहे. यामध्ये सभासदाचे हित किती आणि येणाऱ्या आव्हानांसाठी आपण किती समर्थ आहोत? याचा विचार सत्ताधारी आणि विरोधकांनी सुद्धा करण्याची गरज आहे. 


लम्पीने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले


राज्यातील सर्वाधिक लम्पीबाधित पशुधन कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन गमावल्याने शेतकरी संकटात आहेच, पण लाखमोलाचं जनावर गोठ्यातून गेल्याने मोठा आर्थिक भार पडला आहे. याचा प्रत्यक्ष नसला, तरी अप्रत्यक्ष का असेना गोकुळवर परिणाम झाला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, शेतीही तोट्यात आणि जोडधंदाही आतबट्ट्यात अशी स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नाळ जोडलेल्या गोकुळचे उत्तरदायित्व कैकपटीने वाढते. पशुधन वाढवण्याासाठी तसेच दुध उत्पादन वाढवण्यासाठी निश्चित पुढाकार घेऊ शकतात. मात्र, या मुद्यांवर कधीच चर्चा होताना दिसत नाही. 


गोकुळ हा असाच सहकारातील बालेकिल्ला राजकारणाचा अड्डा होत गेल्यास दारावर येऊन ठेपलेला अमुल येऊन कधी जिल्हा गिळंकृत करून गेला हे कळणार सुद्धा नाही, अशी स्थिती निर्माण होत चालली आहे. त्यामुळे सहकार रुजवलेल्या पंढरीत चुल पेटवत न्यायची की राजकारणाने चुलीत पाणी ओतायचे? याचा विचार सत्ताधारी आणि विरोधकांनी करण्याची गरज आहे.


एक नजर गोकुळच्या उलाढालीवर 



  • गोकुळची वार्षिक उलाढाल 3 हजार 428 कोटी रुपये

  • वर्षभरात 47 कोटी 44 लाख दूध संकलन

  • विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिन 1 लाख 4 हजार लिटरची वाढ

  • नेव्हीकडून गोकुळच्या फ्लेवर्ड दुधाला मागणी

  • 9 कोटी 19 लाख 8 हजार रुपयांचा गोकूळला यावर्षात नफा

  • वर्षभरात म्हैशीच्या दुधाला 8 तर गायीच्या दुधाला 10 रुपये ज्यादा दर

  • लवकरच गोकुळचा स्वतःचा पेट्रोल पंप

  • गोकूळ मिल्क ई सुविधा नावाचे गोकूळकडून अँप सुरू


इतर महत्वाच्या बातम्या