सांगली : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटावर चाकूने उजव्या बाजूला भोसकून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सांगली शहरात (Sangli Crime) घडली. शहरातील चैतन्यनगरमध्ये रविवारी ही घटना घडली. पतीने पत्नीला जातिवाचक शिवीगाळही केल्याची फिर्याद जखमी विवाहितेच्या नातेवाईक महिलेनं संजयनगर पोलिसांमध्ये दिली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी संशयित सचिन रामचंद्र कदम ( वय 23, रा. चैतन्यनगर, सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोटात चाकून भोसकल्याने जखमी झालेल्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पत्नीला भोसकून पती सचिन फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरु होते.
दुसरीकडे राहण्यास का गेलीस? तुझ्या चारित्र्यावर संशय येतो
या वादातून त्याची पत्नी दुसरीकडे राहण्यास गेली होती. त्यामुळे सचिनला राग आला होता. त्यामुळे शनिवारी दुपारी सचिनने पत्नीला स्वतःच्या घरी बोलावून घेतलेय यावेळी त्याने दुसरीकडे राहण्यास का गेलीस? मला तुझ्या चारित्र्यावर संशय येतो अशी विचारणा केली. यातून दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचं भांडण झालं. या भांडणातून सचिनने पत्नीच्या पोटात डाव्या बाजूला चाकून भोसकले. सचिनने खुनी हल्ला केल्यानंतर पत्नी रक्तबंबाळ होऊन आरडाओरडा करू लागली. त्यांच्या आवाजामुळे शेजारचे लोक धावून आल्यानंतर सचिनने पळ काढला.
गुन्हा मागे घेण्यासाठी इस्लामपुरात एकाचे डोकं फोडलं
दरम्यान, जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात बेघर वसाहतीमध्ये पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळक्याने एकाचे दगडाने डोकं फोडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. मारहाण करणाऱ्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या राहुल थावरू राठोड (वय 27, रा. भुदरगड अपार्टमेंट, बेघर वसाहत) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सुनील मोहन चव्हाण, पूजा सुनील चव्हाण (रा. जयगड अपार्टमेंट), धनाजी माधू चव्हाण, हरी माधू चव्हाण, सीताबाई धनाजी चव्हाण, सुमन हरी चव्हाण (रा. भुदरगड अपार्टमेंट) अशा सहा जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीची पत्नी पल्लवीने सुनीलचा भाऊ राहुलविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून व तो गुन्हा मागे घेण्यासाठी हल्लेखोरांनी राहुल राठोडला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पूजा चव्हाणने दगडाने डोके फोडल्याने राहुल जखमी झाला.
इतर महत्वाच्या बातम्या