गडहिंग्लज (कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लज (Gadhinglaj) तालुक्यातील भडगाव पैकी मुकनावर वसाहतीजवळ क्रशरच्या खाणीतील पाण्यात बुडणाऱ्‍या मुलाला वाचवताना आईचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय 32 वर्षे) आणि मल्लिकार्जुन (वय 10 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मायलेकांच्या दुर्दैवी मृत्यूने समाजमन सुन्न झाले. यावेळी त्यांच्यासोबत चिमुकली भाची सुद्धा होती. दोघेही पाण्यातून बाहेर न आल्याने तिने पळत घरी धाव घेतली. यानंतर अनेकजण धावत घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सुजाता यांच्या मागे आई, वडील, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

Continues below advertisement

मिठी मारल्याने दोघेही बुडाले

भडगावपासून तीन किलोमीटर अंतरावर चिंचेवाडी रोडलगत मुकनावर वसाहतीच्या शेजारी क्रशर खाण आहे. त्याठिकाणी सुजाता कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी भाची अनुष्काही सोबत होती. मुलगा मल्लिकार्जुन सायकलने आईजवळ खाणीत आला. पोहता येत नसतानाही यानंतर तो आंघोळीसाठी पाण्यात उतरला. जवळच आंघोळ करत असल्याने सुजाताही कपडे धूत होत्या. यावेळी अचानक पाय घसरल्याने मल्लिकार्जुन खोल खड्ड्यात बुडू लागला. बुडू लागल्यानंतर सुजाताही मुलाला वाचवण्यासाठी खोल पाण्यात गेल्या. मात्र, मल्लिकार्जुनने तिला मिठी मारल्याने दोघेही बुडाले.

भेदरलेल्या भाची अनुष्काची घराकडे पळाली आणि आजोबांना घेऊन आली 

दोघेही पाण्यात दिसून न आल्याने सोबत आलेली अनुष्का पळत घराकडे गेली. आजोबांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघेही दिसत नसल्याने शोधाशोध सुरु केली. कपडे पाण्याशेजारील दगडावर तसेच होते. मल्लिकार्जुनची सायकलही होती. यामुळे काठीने शोध घेण्यात आल्यानंतर काठीला गाऊन अडकल्याने मृतदेह पाण्यावर आले. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

Continues below advertisement

सुजाता यांचा विवाह हुक्केरी तालुक्यातील कुरणीत सिद्धाप्पा यांच्याशी झाला होता. मात्र, आठ वर्षांपूर्वी सिद्धाप्पांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. त्यावेळी आदर्श आणि मल्लिकार्जुन दोघेही लहान होते. त्यामुळे मुलांना घेऊन सुजाता माहेरी आल्या होत्या आणि आई-वडिलांसोबत मजुरी करत होत्या. थोरला मुलगा आदर्श सहावीत आहे, तर मल्लिकार्जुन चौथीत शिकत होता. त्यामुळे आई वडिलांचे छत्र हरवल्याने आणि भावाचा मृत्यू झाल्याने आदर्श पोरका झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या