Hasan Mushrif ED Raid : ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफांची पहिली तोफ समरजितसिंह घाटगेंवर! म्हणाले, कागलमधील भाजप नेत्याने चार दिवसांपूर्वीच...
Hasan Mushrif : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाया कमी झाल्या आहेत असे वाटत असतानाच नव्या वर्षात ईडी पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात सक्रीय झाली आहे.
Hasan Mushrif ED Raid : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाया कमी झाल्या आहेत असे वाटत असतानाच नव्या वर्षात ईडी पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात सक्रीय झाली आहे. पहिल्यांदा अनिल परब यांची संपत्ती तात्पुरती जप्त केल्यानंतर आता हसन मुश्रीफ यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. माजी मंत्री आमदार मुश्रीफ यांचे कागलमधील निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी छापेमारी ईडीने सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केली आहे. मुश्रीफ आणि गाडेकर यांच्या निवासस्थानाला दिल्ली पोलिसांनी वेडा दिला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, ही कारवाई होत असताना हसन मुश्रीफ वैयक्तिक कामासाठी मुंबईत आहेत. त्यांनी सोशल मीडियातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांचा नामोल्लेख न करता भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कागलमधील त्यांचे कट्टर राजकीय वैरी समरजितसिंह घाटगे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. कागलमधील भाजप नेत्याने गेल्या चार दिवसांपासून ईडीने कारवाई करण्यासाठी दिल्ली वाऱ्या केल्या होत्या, असे मुश्रीफ म्हणाले.
हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीला फेऱ्या मारून माझ्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना चारच दिवसात ईडीची कारवाई होणार असल्याचे सांगतले होते हे मी जबाबदारीने सांगतो. अशा प्रकारे नाऊमेद करून गलिच्छ राजकारण सुरु आहे. राजकारणात अशा कारवाई होणार असतील, तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. नवाब मलिकानंतर माझ्यावर कारवाई झाली. किरीट सोमय्या अस्लम शेख यांच्यावर कारवाई होणार असे म्हणत आहेत. त्यामुळे विशिष्ट जाती धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे का? अशी शंका येते.
हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या मुलीच्या घरावर तसेच नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. मी कामानिमित्त बाहेर असल्याने मला दूरध्वनीवरून कारवाईची माहिती समजली. कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी, अशी मी विनंती करत आहे. कागल बंदची हाक देऊ नये, त्यांना तपासात सहकार्य करावे, अशी मी विनंती करत आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य माझ्या कार्यकर्त्यांनी करू नये. यापूर्वी पडलेल्या छापेमारीत सगळी माहिती घेतली होती, आता का कारवाई केली माहीत नाही. गेल्या 35 वर्षांपासूनचे माझे सार्वजनिक जीवन लोकांसमोर आहे. मी सर्व माहिती घेऊन माध्यमांकडे खुलासा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या