Hasan Mushrif ED Raid : आमदार  हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी कागलमध्ये ईडीकडून आज (11मार्च) तिसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली. आज पहाटे सहा वाजता कागलमधील त्यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कागलमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आपल्या अडचणी घेऊन आले होते. मात्र, त्यांना छापेमारी झाल्याचे समजतात त्यांच्या भावना त्यांनी संतप्तपणे व्यक्त केल्या. प्रवेशद्वारावर त्यांनी धडक मारली. मात्र, हा सगळा घटनाक्रम होत असताना कागल पोलिसांना याची कोणताही माहिती नसल्याचे समोर आलं आहे. छापेमारी सुरु झाल्यानंतर तासाभराने कागल पोलिसांचा फौजफाटा मुश्रीफ यांच्या निवासस्थानी पोहोचला. यावेळी कार्यकर्ते प्रवेशद्वाराजवळ होते. त्यामुळे त्यांना मागे हटवण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. 


मागील वेळी ईडी छापेमारी करण्यासाठी आल्यानंतर मुश्रीफ यांच्या निवासस्थानापासून 100 मीटर दूर कार्यकर्त्यांना रोखण्यात आले होत. त्यावेळी तेथून कार्यकर्त्यांनी निषेध केला होता. आज मात्र परिस्थिती थोडीशी उलट पाहायला मिळाली. मुश्रीफ यांच्या निवासस्थानाच्या गेटवर कार्यकर्ते येऊन पोहोचले. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागला. कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारातच ठिय्या मारत घोषणाबाजी केली. 


दुसरीकडे हे होत असतानाच हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने संतप्त प्रतिक्रिया दिली. छापेमारी करण्यापेक्षा एकदाच येऊन आम्हाला गोळ्या घालून संपवून टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. भैया माने यांनी सुद्धा या ठिकाणी बोलताना या कारवाईचा निषेध केला. कारवाई सुरू होत असताना कोल्हापूरहूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कागल येथे निवासस्थानी पोहोचले. राजेश लाटकर यांनीही या कारवाईचा निषेध केला.


राष्ट्रवादीकडून कारवाईचा निषेध


दरम्यान, ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच काँग्रेसकडून नाना पटोले, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात येत असल्यातं आश्चर्य नाही. अनिल देशमुखांच्या केसमध्ये ईडी, सीबीआयकडून वर्ल्ड रेकाॅर्ड केला होता. 109 वेळा छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे ईडी सीबीआयने विक्रम केला होता तो मोडायचा असेल ही शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्यांदा ईडी छापेमारी करत आहे. पहिल्या दोन कारवाईत काय झालं याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या