Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याभोवती ईडीने फास आणखी आवळला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. आज सकाळी कागलमधील त्यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले आहे. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू केली आहे. आज हसन मुश्रीफ कागलमध्ये येणार हे माहीत असल्याने त्यांचे समर्थक तसेच कार्यकर्ते त्यांच्या समस्या घेऊन निवासस्थानी जमा झाले होते. त्यांना ईडी कारवाई सुरु असल्याचे समजताच त्यांनी आपल्या भावना प्रकर्षाने व्यक्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ ईडीच्या रडारवर असल्याने कार्यकर्ते संतापले आहेत.
''एकदाच गोळ्या घालून जा''
दरम्यान, यावेळी मुश्रीफांच्या पत्नीला भावना अनावर झाल्या. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, किती वेळा यायचं या ठिकाणी? किती त्रास द्यायचा काही आहे की नाही? रोज उठून तेच सुरू आहे, एवढं काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे आणि असं का करता? आम्ही करायचं तरी काय, यांना आम्हाला एकदाच गोळ्या घालून जायला सांगा. दुसरीकडे भैया माने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे जे काही जमलेले लोक आहेत ते समर्थक नव्हे, तर ते कामासाठी आलेले लोक आहेत. हसन मुश्रीफ ट्विट करतात आणि ईडी कारवाई होते, ईडीची बातमी त्यांना कशी कळते? अशी विचारण्यात त्यांनी यावेळी केली. त्यांनी सांगितले की, मुश्रीफ हे गोरगरिबांचे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत. त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून 1200 जणांना काम दिलं आहे. दोन हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. कागल तालुक्यामध्ये समृद्धी आणली आहे.
हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर
किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी 11 जानेवारी रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर 21 दिवसांनी ईडीने ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासह कागल तालुक्यातील सेनापशी कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेवर छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर त्यांना दिलासा मिळाला असला, तरी आजच्या कारवाईने पुन्हा त्यांना झटका बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या