Hasan Mushrif ED Raid : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Action) यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच काँग्रेसकडून नाना पटोले, खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा कारवाईचे आश्चर्य नाही, अनिल देशमुखांच्या केसमध्ये ईडी, सीबीआयकडून वर्ल्ड रेकाॅर्ड केला होता. 109 वेळा छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे ईडी सीबीआयने विक्रम केला होता तो मोडायचा असेल ही शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्यांदा घरी जात आहे, तर पहिल्या दोन कारवाईत काय झालं याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. मात्र, आता ही शंका न राहता खरंच त्या दिशेने पाऊल जात असल्याचे दिसून येत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे घटक आहेत. देशमुख, खडसे, राऊत, नवाबाभाई असतील त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, त्याच पद्धतीने कारवाई होत आहे. देशातील ईडी सीबीआयच्या 95 टक्के कारवाई या विरोधकांवरील आहेत. संविधानाचा सन्मान न करता केंद्र सरकार काम करत आहे. ''
अमित शाह यांच्या निदर्शनास आणून देणार
सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफांवरील कारवाई संदर्भात अमित शाह यांच्या निर्दशनास आणून देणार असल्याचे म्हटले आहे. देशातील सर्वोच्च यंत्रणा कारवाई एखाद्या भाजप नेत्यांना आधीचं कस कळतं? याचा अर्थ ईडी आणि सीबीआयमध्ये कोठेतरी लीकेज असल्याचे त्या म्हणाल्या.
हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा कारवाई; जयंत पाटील काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई अत्यंत धक्कादायक आहे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ''काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत घर आणि कारखान्यावर छापेमारी केली. आयकरनेही धाडी घातल्या होत्या. त्यांच्यावर खोटे गुन्हेही दाखल केले होते. यावरून स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. उच्च न्यायालयाने कालच कोणत्या प्रकारे ताशेरे ओढले आहेत ते लक्षात घेणं आवश्यक होतं. एकाच ठिकाणी धाडी टाकणे, त्रास देणं का तर विरोधात आहे म्हणून. गेल्या दोन वर्षांपासून त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधांमधील लोकांवर कारवाई होत आहे. सत्ताधाऱ्यांची चौकशी करत नाही. अर्जाची दखल घेतली जात नाही. ''
इतर महत्वाच्या बातम्या