Gokul : कोल्‍हापूर (Kolhapur News) जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (Gokul) संघाकडून दूध विक्री दरात वाढ करुन ग्राहकांना झटका दिला असला, तरी म्‍हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करत उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध खरेदी दरवाढीचा निर्णय झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. म्‍हशीच्या दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर 49.50 रुपये राहिल आणि गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर 37 रुपये असा असेल. दूध उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. 


दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले की, दरवाढ केल्याने दूध उत्पादकांना फायदा होणार आहे. सध्या दैनंदिन दूध संकलन सरासरी 15 लाख लिटर आहे. त्यापैकी म्हैस दूध आठ लाख 50 हजार लिटर आणि गाय दूध सहा लाख 50 हजार लिटर इतके आहे. या दूध दरवाढीमुळे रोज सरासरी 30 लाख रुपये म्हणजेच प्रतिमहिना नऊ कोटी रुपये रक्कम संघाच्या दूध उत्पादकांना दूध बिलापोटी अतिरिक्त मिळणार आहेत. 


दूध दरवाढीचा ग्राहकांना फटका


दुसरीकडे, गोकुळकडून दूध विक्री दरात वाढ करण्यात आल्याने ग्राहकांना तगडा झटका बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळने दुधाचे दर वाढवले आहेत. राजधानी मुंबईत म्हशीच्या दूध दरामध्ये तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर गायीच्या दुधात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत म्हशीच्या दुधाचा दर आधी प्रतिलिटर 69 रुपये होता तो आता 72 रुपयांवर पोहोचणार आहे, तर गायीच्या दुधाचा दर 54 वरुन 56 रुपयांवर प्रति लिटर पोहोचणार आहे. 10 फेब्रुवारीपासून नव्या दराची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 


कोल्हापुरात दोन रुपयांची वाढ 


कोल्हापुरात म्हशीच्या दुधाचा एक लिटरचा दर 64 रुपयांवरुन 66 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. गायीचे दूध प्रति लिटर 48 रुपयावरुन 50 रुपये इतके करण्यात आले आहे. पुण्यामध्ये म्हशीच्या दुधात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे म्हशीच्या एक लिटर दुधाचा दर 70 रुपयांवरुन 72 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. गायीचे दूध प्रति लिटर 56 रुपयांना मिळणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या