Kolhapur News : शासकीय योजनांसाठी महत्वाचा दस्तावेज असलेल्या आधार कार्ड (Aadhaar card) आणि रेशनकार्डचा (Ration Card) गैरवापर किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे, याचा प्रत्यय कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात आला आहे. इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji Aadhaar Card) नदी पात्राची स्वच्छता करताना तब्बल एक पोतं भरुन आधार कार्ड सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दीड महिन्यांमध्ये हजारो रेशन कार्डचा ढीग सापडल्यानंतर आता आधारकार्ड सापडल्याने यामध्ये मोठं रॅकेट आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे. रविवारी आधार कार्डचा गंभीर प्रकार आढळून आला. आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचे वय साधारण 60 ते 65 वयापर्यंत आहे. त्यामुळे पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकारही सुरु आहेत. त्यासाठी हा प्रकार सुरु आहे का? अशीही चर्चा आहे. 


राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना पोतं सापडलं 


पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना हे पोतं तरंगताना दिसल्याने बाहेर काढले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नदीत सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेली सर्व आधार कार्ड इचलकरंजी शहर आणि परिसरातील असल्याचे समजते. इचलकरंजी परिसरात आधार कार्ड आणि रेशन कार्डचा ढीग सापडत चालल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


आधार कार्ड बाहेर काढल्यानंतर सर्व ओरिजिनल असल्याचे समजते. इचलकरंजी शहरासह जवाहरनगर, कोरोची, कबनूर भागातील आहेत. आधार कार्डवरुन काहींना संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी ती आपल्याकडेच सांगितले. दरम्यान, आधार कार्ड तयार करण्याची काही नावे समोर आली असून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे. या संदर्भातील अहवाल तहसीलदारांना पाठवण्यात येणार आहे.  


बनावट आधार कार्डने अल्पवयीन मुलीची प्रसुती 


दरम्यान, कसबा बावड्यामध्ये (Kolhapur News) झालेल्या प्रसूतीमध्ये मुलीच्या पालकांनी बोगस आधार कार्डचा वापर करून प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाईल्ड लाईन तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभागाने उघडकीस आणला. ही मुलगी सध्या 15 वर्षे 7 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ती मुलगी साडेतेरा वर्षाची असताना तिचा विवाह झाल्याचे समोर आलं आहे. मुलीच्या आईने तिचा विवाह मंगसुळी या ठिकाणी लावून दिला होता अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे मजुरीसाठी गिरगावमध्ये आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन विवाहितेची प्रसूती झाली होती. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या