Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील आय प्लॅनेट या मोबाईलच्या दुकानात 4 दिवसांपूर्वी मोठी चोरी झाली होती. यामध्ये चोरट्यांनी एक दोन नव्हे तर दुकानातील 60 ते 70 आयफोनसह सीसीटीव्ही डिव्हीआर सुद्धा लंपास केला होता. 


कोल्हापूर पोलिसांनी एका आठवड्यात या प्रकरणाचा छडा लावताना 57 महागडे आयफोन, 3 बॅटरी, 20 चार्जर, सीसीटीव्ही डिव्हीआरसह 11 लाख 65 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केला. पोलिसांनी तिघा आरोपींना कर्नाटकातील बेळगाव येथून अटक केली असून असून अधिक तपास सुरू आहे.


सुरज आनंदा पाटील (वय 18, रा. नागनूरबारबै, ता.चिकोडी, जि.बेळगाव), अमर संजय नाईक (वय 18, रा. नागनूरबारबै, ता.चिकोडी, जि.बेळगाव) आणि ऋषिकेश गोवर्धन महाजन (वय 18, रा. कोर्णी, ता.चिकोडी, जि.बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बेळगाव येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.


अख्खं दुकान आणि सीसीटीव्ही डिव्हीआर केले होते लंपास


मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या जेमस्टोन इमारतीमधील निखिल नांगावकर यांचे आय प्लॅनेट दुकानात यापूर्वी मोठी चोरी झाली होती. चोरट्यांनी शोरूमचे कुलूप तोडून त्यातील अनेक मोबाईल लंपास केले होते. लाखो रुपयांचे हे आयफोन होते. त्यावेळी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. 


मात्र 15 जुलै रोजी पुन्हा याच दुकानाच्या पाठीमागे असणाऱ्या खिडकीतून प्रवेश करत 60 ते 70 सेकंड हॅन्ड, नवीन आयफोनची चोरट्यांनी चोरी केली होती. लाखो रुपये किंमतीचे हे मोबाईल होते. चोरीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  विशेष म्हणजे चोरट्यांनी मोबाईल लंपास केलेच होते, शिवाय दुकानातील सीसीटीव्हीचे सर्किट डिव्हीआर, महत्वाचे बिलबुक तसेच इतर साहित्य सुद्धा लंपास केले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या