Kolhapur Crime : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले असले, तरी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक फुटीर आमदारांकडून मंत्रिपदाची आस लागल्याने सीएम भाईंसमोर आपली राजकीय निष्ठा दाखवण्याचे आणि शक्तीप्रदर्शन करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. भाजपमध्येही गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेविना तडफडत असलेल्या अनेकांना मंत्रिपदाची आस लागून राहिली आहे.  


नेमक्या याच राजकीय स्थितीचा लाभ घेत थेट आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे. एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


या आरोपींची नावे रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, सागर विकास संगवई, आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हे आरोपी आणखी किती आमदारांच्या संपर्कात होते आणि किती जणांना पैसे दिले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.


कोल्हापूरचा रियाज या कटाचा मुख्य सुत्रधार


अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील रियाज हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली येथील आहे. तोच या कटाचा मुख्य सुत्रधार आहे. त्याचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले असून त्याला झटपट श्रीमंतीचा नाद लागला होता. सुरुवातीला व्हिडिओ सेंटरमध्ये काम केल्यानंतर केबल व्यवसायात उतरला. तेथून त्याने मोर्चा मायनिंगकडे वळवत बक्कळ पैसा कमवून अलीशान जीवन जगू लागला. या दरम्यान त्याचे राजकीय नेत्यांशी संबंध येऊ लागले. रियाजने मोठा डाव एका दमात साध्य करण्याच्या इराद्याने थेट आमदारांना गंडवण्याचा बेत रचला, पण त्याचा डाव अंगलट आल्याने आता बेड्या पडल्या आहेत.  


3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न 


राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक आमदार नंदनवन (एकनाथ शिंदे यांचा बंगला) आणि सागर (देवेंद्र फडणवीस यांचा बंगला) या ठिकाणी फेऱ्या मारताना दिसत आहेत. याचा फायदा घेत चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. 


तसेच मोठ्या मंत्र्यांनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, सुत्रांच्या माहितीनुसार, हे आरोपी एका बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याचे समजते. फोनवरील संभाषणानंतर 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांची ओबेरॉय हॉटेलमध्ये भेट घेतली.


उर्वरित रक्कम मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर द्या..


मंत्रिमंडळात स्थान हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, त्यापैकी 20 टक्के रक्कम आता द्यावी लागेल आणि उर्वरित मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर द्यावी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले. आरोपींनी सोमवारी आमदारांना नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले, त्यानंतर आमदारांनी त्यांना पैसे घेण्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सापळा रचून एका आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी 3 आरोपींची नावे समोर आली, ज्यांना नंतर अटक करण्यात आली.


इतर महत्त्वाच्या बातम्या